Join us

बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:23 IST

Text Neck : फोनचा जास्त वापर हा घातक ठरत असून अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. अशातच आणखी एक नवा आजार समोर आला आहे तो म्हणजे टेक्स्ट नेक.

आजच्या काळात स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. रिसर्चनुसार, १८ ते ४४ वयोगटातील ७९% लोक जवळपास नेहमीच त्यांच्या फोनसोबत असतात. फोनचा जास्त वापर हा घातक ठरत असून अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. अशातच आणखी एक नवा आजार समोर आला आहे तो म्हणजे टेक्स्ट नेक. डोकेदुखी आणि मानदुखीपासून त्याची लक्षणं सुरू होतात, परंतु निष्काळजीपणामुळे ही समस्या नंतर गंभीर रूप धारण करते. मानेच्या समस्यांपासून ते मणक्याच्या आकारामध्ये बदल होतात, ज्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्जरी करावी लागते.

टेक्स्ट नेक म्हणजे काय?

जे लोक अनेकदा स्मार्टफोन वापरतात ते फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खाली पाहतात. डोकं जास्त वेळ खाली ठेवल्याने मानेवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे मणक्याचा वरचा भागात वय वाढण्याची प्रक्रिया वेगवान होते. अनेकदा ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आरामदायी व्यवस्था नसते, खुर्च्या व्यवस्थित नसतात. बसण्याची पद्धत चुकीची असते. कामाच्या दरम्यान ब्रेक घेता येत नाही आणि बराच वेळ एकाच स्थितीत काम केल्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवू शकते.

टेक्स्ट नेकची लक्षणं कोणती?

टेक्स्ट नेकच्या सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखी, खांदेदुखी आणि सतत मानदुखी यांचा समावेश आहे. जर समस्या गंभीर झाली तर हाताची बोटं दुखतात किंवा हाताला मुंग्या येतात, सुन्नपणा जाणवू शकतो. 

दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

जर टेक्स्ट नेककडे दुर्लक्ष केलं आणि वेळेत योग्य उपचार केले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये मणका वाकडा होतो, संधिवात, मणक्याचं अलायमेंट चुकतं, आकार बिघडतो. मणका कमकुवत होतो, डिस्क स्पेसमध्ये दाब, डिस्क हर्निएशन, सूज येते, मज्जातंतू किंवा स्नायूंना नुकसान होतं. 

टेक्स्ट नेक सिंड्रोमवर उपचार करण्यासाठी फिजिओथेरपी करावी लागते. तसेच काही व्यायाम देखील प्रभावी ठरतात. मात्र लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल करून या आजारापासून वाचू शकता. काम करताना योग्य स्थितीत बसा. टेक्स्ट नेक सिंड्रोमपासून आराम मिळविण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करणं अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सस्मार्टफोन