Shy Bowel Syndrome : कधी आपल्यासोबत असं घडलं आहे का की ऑफिस ट्रिपवर असताना, एखाद्या मित्राच्या घरी थांबलेले असताना किंवा मॉलमध्ये अचानक टॉयलेटला जाण्याची गरज भासते, पण कमोडवर बसताच सगळं जणू 'जाम' होतं? जर आपल्यासोबत असं घडलं असेल तर आपण असे एकटे नाही आहात. मेडिकल विश्वात या अवस्थेला पार्कोप्रेसीस म्हणतात. याला ‘शाय बॉवेल सिंड्रोम’ असंही म्हणतात. ही कोणतीही शारीरिक आजारपणाची समस्या नसून, ही एक मानसिक अवस्था आहे. यात व्यक्तीला सार्वजनिक शौचालयात किंवा इतर लोकांच्या उपस्थितीत शौचक्रिया करण्यास अडचण येते. चला तर मग या सिंड्रोमबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
‘शाय बॉवेल सिंड्रोम’ का होतो?
‘शाय बॉवेल सिंड्रोम’ यामागे मुख्य कारण शरीराची कमजोरी नसून मेंदू आणि नर्वस सिस्टीम असते. यामागची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे...
प्रायव्हसी आणि लाज
सामाजिक लाजिरवाणेपणाची भीती हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे. टॉयलेटमधून येणारे आवाज किंवा वास इतर लोकांच्या लक्षात येतील आणि ते आपल्याबद्दल काय विचार करतील, ही भीती अनेकांना असते.
इव्होल्यूशनरी रिस्पॉन्स
आपण असुरक्षित वाटत असताना शरीरातील सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. शौचक्रियेसाठी शरीर रिलॅक्स असणे आवश्यक असते, पण भीती किंवा तणावाच्या अवस्थेत स्नायू आकुंचन पावतात आणि ही प्रक्रिया थांबते.
बालपणीचे अनुभव
लहानपणी टॉयलेट ट्रेनिंगदरम्यान ओरड, शिक्षा किंवा शाळेतील अस्वच्छ टॉयलेट्सचे वाईट अनुभव मनात तसेच असतात. हेच अनुभव पुढे जाऊन शाय बॉवेल सिंड्रोमचे रूप घेऊ शकतात.
हायजीनची चिंता
काही लोक स्वच्छतेबाबत खूप संवेदनशील असतात. सार्वजनिक टॉयलेट घराइतके स्वच्छ नसतात, अशी भावना त्यांना अस्वस्थ करते.
शरीरावर होणारे परिणाम
फक्त घरीच शौच करण्याची सवय सुरुवातीला किरकोळ वाटू शकते, पण दीर्घकाळ शौच रोखून धरल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
बद्धकोष्ठता
वारंवार शौच रोखल्याने तो कठीण होतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
मूळव्याध
शौच रोखून धरल्याने आणि नंतर जोर लावल्याने नसांवर अतिरिक्त दाब पडतो.
मानसिक ताणतणाव
प्रवासात किंवा ऑफिसमध्ये असताना सतत पोटाची चिंता राहते, ज्यामुळे कामातील एकाग्रता आणि उत्पादकता कमी होते.
या स्थितीवर कशी मात करावी?
शाय बॉवेल सिंड्रोममधून बाहेर पडणे शक्य आहे. यासाठी खालील उपाय उपयोगी ठरू शकतात.
हळूहळू सवय लावणे
बाहेरील टॉयलेट्सचा वापर टप्प्याटप्प्याने सुरू करा. आधी मोकळ्या, कमी वापरल्या जाणाऱ्या टॉयलेटपासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू गर्दीच्या ठिकाणी प्रयत्न करा.
मास्किंग
आवाजाची भीती कमी करण्यासाठी मोबाईलवर हलके संगीत ऐकू शकता. त्यामुळे बाहेरील आवाजांकडे लक्ष जात नाही.
श्वसनाचे व्यायाम
टॉयलेटमध्ये असताना खोल श्वास घ्या. यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते आणि शरीर रिलॅक्स होण्यास मदत मिळते.
