Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोळ्यांसाठी 'सायलेंट किलर' ठरतो ग्लुकोमा, पाहा लक्षणं- काचबिंदूचा अनुवंशिक त्रासही दृष्टीसाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:10 IST

What is Glaucoma : सतत डोळ्यातून पाणी येतं, डोळे दुखतात, अशा कितीतरी समस्या सतत होताना बघायला मिळतात. ग्लुकोमा ही डोळ्यांशी संबंधित अशीच एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये हळूहळू दृष्टी कमी होत जाते.

What is Glaucoma : हल्ली डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्या कमी वयातच लोकांना शिकार बनवत आहेत. कुणाला धुसर दिसतं, कुणाला दूरचं किंवा जवळचं दिसत नाही. सतत डोळ्यातून पाणी येतं, डोळे दुखतात, अशा कितीतरी समस्या सतत होताना बघायला मिळतात. ग्लुकोमा म्हणजेच काचबिंदू ही डोळ्यांशी संबंधित अशीच एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये हळूहळू दृष्टी कमी होत जाते. एक्सपर्ट सांगतात की, ग्लुकोमामध्ये डोळ्याच्या आतला दाब वाढल्यामुळे ऑप्टिक नर्व्हचं नुकसान होतं. ही नर्व्ह डोळ्यांतून मेंदूपर्यंत पाहण्याची माहिती पोहोचवते. जेव्हा ही नर्व्ह हळूहळू खराब होऊ लागते, तेव्हा दृष्टीवर परिणाम होतो. वेळेत उपचार न केल्यास ग्लूकोमा कायमस्वरूपी अंधत्वाचे कारण ठरू शकतो.

ग्लुकोमा 'डोळ्यांचा सायलेंट किलर'?

ग्लुकोमाला डोळ्यांचा सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण त्याची सुरुवातीची लक्षणे सहसा लगेच जाणवत नाहीत. बऱ्याच केसेसमध्ये आजार बऱ्याच प्रमाणात वाढेपर्यंत रुग्णाला कोणतीही विशेष तक्रार जाणवत नाही. हळूहळू पाहण्याची व्हिजन फील्ड कमी होत जाते, पण हा बदल इतका हळूवार असतो की रुग्णाला त्याची जाणीवच होत नाही.

सुरुवातीला फारशी अडचण जाणवत नाही

या आजारात सगळ्यात आधी पाहण्याची क्षमता कमी होते. सुरुवातीच्या टप्प्यात सरळ पाहण्यात अडचण नसल्यामुळे लोक ही समस्या दुर्लक्षित करतात. कालांतराने हा त्रास वाढतो आणि शेवटी सरळ दृष्टीदेखील बाधित होऊ शकते. एकदा ऑप्टिक नर्व्हचे नुकसान झाले की ते भरून निघत नाही, म्हणून लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्लुकोमाचा धोका सर्वाधिक कोणाला?

ग्लुकोमा कोणत्याही वयात होऊ शकतो, पण 40 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो. तसेच 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये ग्लूकोमा होण्याची शक्यता सहा पट अधिक असते. ज्यांच्या कुटुंबात ग्लुकोमाचा इतिहास आहे, ज्यांना डायबिटीस किंवा उच्च रक्तदाब आहे, तसेच जे लोक दीर्घकाळ स्टेरॉईड औषधे घेतात, त्यांच्यात हा धोका वाढतो.

ग्लुकोमापासून बचाव कसा करावा?

ग्लुकोमापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमित डोळ्यांची तपासणी. डोळ्यांचा दाब तपासणे, ऑप्टिक नर्व्हची चाचणी आणि दृष्टी क्षेत्राची तपासणी यामुळे हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो. ग्लुकोमा अवेअरनेस मंथचाही उद्देश लोकांना डोळ्यांची नियमित तपासणी किती आवश्यक आहे हे पटवून देणे हाच आहे, जेणेकरून वेळेत उपचार सुरू करून दृष्टी वाचवता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Glaucoma: Silent killer of eyes; Early detection prevents major damage.

Web Summary : Glaucoma, a silent eye disease, causes gradual vision loss due to optic nerve damage. Often symptomless initially, regular checkups are crucial, especially for those over 40 or with family history, diabetes, or steroid use. Early detection and treatment can prevent blindness.
टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्सआरोग्य