सायली कुलकर्णी (सायकॉलॉजिस्ट)
आई आणि आजीसोबत क्लिनिकला आलेला 'आर्यन'. वय वर्षे अवघे ४. मुळातच उशिरा बोलायला लागलेला आर्यन त्याच-त्याच शब्दांचा पुन्हा उच्चार करतो. अस्पष्ट बोलतो, एकंदरीत आय-कॉन्टॅक्ट करत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे पाणी हवंय, भूक लागली अशा रोजच्या व्यवहारातील गोष्टींबाबतही तो संवाद साधू शकत नाही.
आर्यनची आजी म्हणाली, ‘आमचं बाळ मुडी आहे. तो बऱ्याचदा अचानकच चिडतो, रडतो. बोलतच नाही, विनाकारण आकाश-पाताळ एक करतो.’
प्रथमदर्शनी आर्यनची ही लक्षणे स्वमग्नता - ASD अर्थातच ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ची आहेत, असे वाटू शकते; पण हा नेमका काय प्रकार आहे? हे जाणून घेण्यासाठी आणि सुयोग्य निदान करण्यासाठी मला केस हिस्ट्री घेणं गरजेचं हाेतं. त्यातून लक्षात आलं की अवघ्या ४ वर्षांचा आर्यन दिवसातून जवळपास ६ तास आयपॅड, टीव्ही, मोबाइल याच्यावर कार्टून्स बघतो. सहा महिन्यांचा होता तेव्हपासून म्हणे तो मोबाइल कार्टून्स बघितल्याशिवाय तोंडात घासच घेत नाही.
आर्यनसारख्या केसेसच्या बाबतीत स्वमग्नता अर्थातच ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’चे निदान करण्यापूर्वी त्यांच्या विकासाच्या टप्प्यांचे वर्तनात्मक विश्लेषण व मूल्यमापन, स्क्रीनशी संबंधित इतिहास पाहणे आवश्यक ठरते. अशावेळी स्क्रीन टाइम कमी करण्याचा सल्ला देऊन (उदा. १-२ महिने) त्या आधारावर वर्तनातील बदलांचे निरीक्षण करणे आवश्यक ठरते. अर्थातच डायग्नोसिस करण्यापूर्वी या सर्वाला सायकोमॅट्रिक असेसमेंटची जोड देणे नक्कीच गरजेची असते. व्हर्च्युअल ऑटिझम, पारंपरिक ऑटिझम किंवा इतर न्यूरोलॉजिकल समस्यांचे निदान करण्यासाठी या सर्व पातळ्यांचा एकत्रित विचार केला जातो आणि मगच निदान केले जाते. आर्यनच्या केससंदर्भात वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता त्याला व्हर्च्युअल ऑटिझम असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे नेमकं काय?
१. व्हर्च्युअल ऑटिझम हा एक प्रकारचा विकासात्मक विलंब आहे, जो लहान मुलांमध्ये जास्त स्क्रीन टाइममुळे निर्माण झाल्याचे दिसून येते.
२. व्हर्च्युअल ऑटिझमची लक्षणे प्रथमदर्शी पारंपरिक ऑटिझमसारखी असली तरी, ही वैद्यकीयदृष्ट्या मान्य विकृती किंवा आजार नाही. त्यामुळे या स्थितीला जास्त स्क्रीन टाइम असल्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्तनात्मक समस्यांचा संदर्भ दिला जातो.
३. म्हणूनच अशा विकासात्मक समस्या असणाऱ्या मुलांचे तज्ज्ञांकडून निरीक्षण व निदान करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालक, शिक्षक यांना व्हर्च्युअल ऑटिझमची प्राथमिक लक्षणे माहिती असणे अत्यावश्यक आहे.
लक्षणं काय दिसतात?
१. भाषा विकासात उशीर : शब्दसंग्रह कमी असणे किंवा बोलण्यात अपयश.
२. सामाजिक अलिप्तता : डोळ्यात डोळे घालून न पाहणे व इतरांशी संवाद साधण्यास अडचण.
३. वारंवार कृती : एकाच प्रकारच्या हालचाली किंवा सवयी, ज्या पारंपरिक ऑटिझमसारख्या वाटतात.
४. लक्ष केंद्रित करण्यास अडचण
५. स्क्रीनशिवाय इतर गोष्टींकडे दुर्लक्ष.
५. भावनिक अस्थिरता : वारंवार रागावणे किंवा स्वतःला शांत करण्यात अडचण.
६. मर्यादित आवडी : केवळ स्क्रीनवरील गोष्टी बघण्यात, खेळण्यात रुची. पुस्तकं, खेळ किंवा सर्जनशील ॲक्टिव्हिटीजमध्ये अजिबात रस नसणे.
भविष्यात काय त्रास?
भारतात सद्य:स्थितीत जरी व्हर्च्युअल ऑटिझमसंबंधी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर डेटा उपलब्ध नसला तरी, प्रादेशिक संशोधनावरून असे दिसून येते की, व्हर्च्युअल ऑटिझम ही अत्यंत गंभीर बनत चाललेली समस्या आहे. व्हर्च्युअल ऑटिझम सुरुवातीच्या टप्प्यात हाताळला नाही, तर मुलाच्या सामाजिक, भावनिक आणि शैक्षणिक वाढीवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
१. या मुलांमध्ये भविष्यात भाषा व संवाद कौशल्यांसंदर्भात गंभीर अडचणी निर्माण होतील.
२. स्वतःचे विचार व्यक्त करण्यात व इतरांना समजून घेण्यात अडचण निर्माण झाल्यामुळे अशा मुलांमध्ये निराशा व सामाजिक अलिप्तता निर्माण होऊ शकते. सामाजिक कौशल्यांचा अभाव असेल.
३. इतरांशी मैत्री किंवा नाती निर्माण करण्यात अडचण.
४. ताण, नैराश्य व आत्मविश्वासाची कमतरता.
५. अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या अभावामुळे एकाकीपणाची भावना निर्माण होईल.