शरीराला पुरेसे पाणी मिळणे हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाणी कमी पडले की शरीर लगेच गंभीर आजारी पडेल असे नाही, पण सुरुवातीची लक्षणे वेळेवर ओळखली नाहीत तर हळूहळू त्याचे दुष्परिणाम वाढू लागतात. अनेकदा तहान लागणे एवढेच लक्षण नसते, प्रत्यक्षात शरीर विविध इशारे देत असते.
शरीराला हवे तेवढे पाणी मिळाले नाही की सर्वात आधी तोंड कोरडे पडू लागते. ओठ सतत कोरडे होतात, जीभ कोरडी होते किंवा बोलताना तोंडाला चिकटपणा जाणवतो ही सुरुवातीची लक्षणे असतात. (What if the water level in the body decreases? Should you drink water only when you feel thirsty? Serious diseases will occur because if you make these mistakes )काही जणांना घसा कोरडा जाणवतो आणि वारंवार पाणी प्यावेसे वाटते. याच वेळी लघवीचे प्रमाण कमी होऊ लागते आणि लघवीचा रंग गडद पिवळा दिसू लागतो. ही शरीराकडून मिळणारी खूप महत्त्वाची सूचना असते.
पाणी कमी झाल्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्वचा कोरडी, निस्तेज वाटू लागते आणि चिमटा घेतल्यावर लगेच पूर्ववत न होता हळूहळू सैल होत जाते. काहींना खाज येणे किंवा त्वचा ताणल्यासारखी वाटणे असा त्रास होतो. सुरकुतल्या सारखे हात आणि पायही याचेच लक्षण आहे. डोळे कोरडे होणे, जळजळ होणे किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे वाढणे हे ही पाणी कमी असल्याचे संकेत असू शकतात.
डोक्यावर आणि मनावरही पाण्याच्या कमतरतेचा परिणाम होतो. सौम्य डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, आळस वाढणे, एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. शरीरात पुरेसे पाणी नसल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि त्यामुळे थकवा लवकर जाणवतो. काही लोकांना कारण नसताना चिडचिड, अस्वस्थपणा किंवा बेचैनी जाणवते.
पचनसंस्थेवरही पाण्याची कमतरता लगेच परिणाम दाखवते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, जडपणा किंवा आम्लपित्ताचा त्रास वाढणे ही लक्षणे दिसू शकतात. लघवी करताना दाह होणे, वारंवार मूत्रसंस्थेचे संसर्ग होणे यामागेही पाणी कमी पिणे हे कारण असू शकते. शरीरात पाणी कमी असेल तर पचनाचे त्रास होतात. पोट साफ होत नाही. दुखत राहते. शौचाची भावना होते पण प्रक्रिया होत नाही.
हे सगळे दुष्परिणाम गंभीर होण्याआधी ओळखण्यासाठी शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तहान लागेपर्यंत थांबणे टाळावे, कारण तहान लागणे म्हणजे शरीर अगदीच पाण्याच्या कमतरतेत गेलेले असते. लघवीचा रंग, तोंड-ओठांचा कोरडेपणा, त्वचेची स्थिती आणि दिवसभर जाणवणारा थकवा यावरून शरीराला पाणी कमी पडत आहे का हे सहज ओळखता येते.
