Sleep Mistakes: तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी झोप किती महत्वाची आहे हे काही वेगळं सांगायला नको. झोप म्हणजे फक्त विश्रांती नव्हे, तर शरीर रिपेअर करण्याची एक प्रक्रिया देखील असते. त्यामुळे रोज पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप गरजेचं असतं. मात्र अनेकवेळा आपण नकळत काही सामान्य चुका करतो, ज्यामुळे केवळ झोपच खराब होत नाही तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अशाच ५ चुकांबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, झोपताना या ५ चुका टाळणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत.
पोटावर झोपणं
अनेक लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते, पण ही पद्धत आरोग्यासाठी योग्य मानली जात नाही. न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, पोटावर झोपल्यामुळे श्वसननलिकेवर दबाव येतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पोटावर झोपणं टाळावं. डाव्या कुशीवर झोपणं सर्वात उत्तम मानलं जातं. यामुळे हृदय आणि श्वसनावर कमी ताण येतो आणि झोपही अधिक शांत लागते.
वारंवार झोपेच्या गोळ्या घेणे
झोप न लागल्यास अनेक लोक स्वतःहून औषधं घेऊ लागतात, पण हे खूप चुकीचं आहे. श्वेता शाह सांगतात की, अशा औषधांचा श्वसनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि चुकीच्या वापरामुळे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत.
रात्री जड आणि उशिरा जेवण
रात्री उशिरा आणि जड जेवण केल्यानं झोपेवर परिणाम होतो. अशा वेळी शरीराला अन्न पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे झोप बिघडते. पचन नीट न झाल्यास गाढ झोप लागत नाही. म्हणून हलकं जेवण घ्या आणि झोपण्याच्या २–३ तास आधी जेवण पूर्ण करा.
डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपणे
आजकाल अनेक जण मोबाईल वापरत झोपतात आणि फोन उशीजवळ ठेवून झोपतात. ही सवयही अत्यंत घातक ठरू शकते. श्वेता शाह सांगतात की, डोक्याजवळ मोबाईल ठेवल्यामुळे रेडिएशन आणि ब्लू लाईटचा परिणाम होतो, ज्यामुळे झोप खराब होते आणि तणाव वाढतो. तसेच सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे गाढ झोप लागत नाही. म्हणून मोबाईल नेहमी दूर ठेऊन झोपावं, शक्य असल्यास सायलेंट मोडवर ठेवावा.
टीव्ही चालू ठेवून झोपणे
काही लोकांना रात्री टीव्ही पाहत झोपायची सवय असते आणि अनेकदा टीव्ही चालूच राहतो. ही सवयही झोपेच्या गुणवत्तेसाठी हानिकारक आहे. स्क्रीनचा प्रकाश आणि आवाज मेंदूला पूर्णपणे शांत होऊ देत नाही. याचा परिणाम हृदयाचे ठोके, श्वसन आणि झोपेच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. म्हणून झोपण्याआधी टीव्ही बंद करा, खोलीत शांतता आणि पूर्ण अंधार ठेवा.
आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, झोप ही आपल्या आरोग्यासाठी अमूल्य आहे. जर आपण या छोट्या-छोट्या सवयी सुधारल्या, तर झोप अधिक चांगली लागेल, शरीर निरोगी राहील आणि ऊर्जा देखील वाढेल. म्हणून आजपासूनच या चुका टाळा आणि योग्य झोपेच्या सवयी फॉलो करा.
Web Summary : Sleeping mistakes can ruin health. Avoid sleeping on your stomach, taking sleeping pills, or eating late. Keep phones away from your head and turn off the TV for better sleep and health, says nutritionist.
Web Summary : सोने की गलतियाँ स्वास्थ्य को बिगाड़ सकती हैं। पेट के बल सोने, नींद की गोलियाँ लेने या देर से खाने से बचें। बेहतर नींद और स्वास्थ्य के लिए फोन को सिर से दूर रखें और टीवी बंद करें, पोषण विशेषज्ञ का कहना है।