6 Hour Sleep Side Effects : आजच्या धावपळीच्या जीवनात झोपेकडे अनेकदा सर्वात आधी दुर्लक्ष केलं जातं. उशिरापर्यंत मोबाईल बघणे, कामाचा ताण, तणाव याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही सलग एक आठवडा रोज ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो? याबाबत न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल फिजिशियन आनंद पंजाबी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. चला जाणून घेऊया त्यांनी काय सांगितलं आहे.
६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास काय होतं?
लाइफस्टाइल फिजिशियन सांगतात की, एखादी व्यक्ती सलग ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असेल, तर तिचं वजन वेगाने वाढू शकतं, जरी तिने डाएट किंवा व्यायामाच्या सवयींमध्ये कोणताही बदल केला नसेल. यामागचं मुख्य कारण म्हणजे हार्मोन्समधील बिघाड.
कमी झोपेमुळे वजन कसं वाढतं?
कमी झोपेमुळे सर्वात आधी घ्रेलिन हा भूक वाढवणारा हार्मोन वाढतो. घ्रेलिन वाढल्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते आणि ओव्हरईटिंगची सवय लागते. दुसरीकडे, लॅप्टिन हा हार्मोन कमी होतो. लॅप्टिन पोट भरल्याची भावना देतो. तो कमी झाल्यामुळे समाधान वाटत नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं.
याशिवाय, कमी झोपेमुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन वाढतो. जास्त कॉर्टिसोलमुळे पोटाभोवती चरबी जमा होते आणि लठ्ठपणा वाढतो. तसेच झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी होते, त्यामुळे शरीर साखरेचा योग्य वापर करू शकत नाही आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
मेंदूवर परिणाम
झोप पूर्ण न झाल्याचा परिणाम मेंदूवरही दिसून येतो. सतत थकवा, अशक्तपणा आणि चिडचिड जाणवते. अशा वेळी गोड, तळलेले आणि जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा होते, जे वजन वाढण्याचं आणखी एक मोठं कारण ठरतं.
जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल आणि स्वतःला फिट व फ्रेश ठेवायचं असेल, तर झोपेला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. रोज किमान ७ तासांची चांगली झोप घेण्याची सवय लावा. वेळेवर झोपणं, झोपण्याआधी मोबाईलपासून दूर राहणं आणि ठरलेली स्लीप रूटीन पाळणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
