निरोगी जीवनासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे, पण ते कधी आणि कसे प्यावे याचे काही नियम आहेत, विशेषत: जेवणानंतर. आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिणे पचनसंस्थेसाठी योग्य मानले जात नाही, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जेवणानंतर किती वेळ पाणी पिऊ नये?
जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. सर्वसाधारणपणे, जेवणानंतर कमीतकमी ३० मिनिटे ते १ तासापर्यंत पाणी पिणे टाळावे. या वेळेत शरीराला अन्न पचवण्यासाठी आवश्यक 'पाचक अग्नी' आणि एन्झाईम्स कार्यरत राहतात.
पाणी लगेच पिण्याचे दुष्परिणाम
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास खालील समस्या उद्भवू शकतात. पोटात अन्न पचवण्याचे काम पाचक रस आणि एन्झाईम्स करतात. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास, पाचक रस पातळ होतात. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. अन्नाचे विघटन करण्यासाठी पोटातील नैसर्गिक आम्ल आवश्यक असते. पाणी प्यायल्याने या आम्लाची तीव्रता कमी होते, परिणामी अन्न पूर्णपणे पचत नाही. अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे, ते आतड्यांमध्ये सडण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि अपचन यांसारख्या समस्या वाढू शकतात.
पचनक्रिया मंदावल्यामुळे, शरीराला अन्नातून मिळणारे महत्त्वाचे पोषक घटक (Nutrients) शोषून घेण्यास अडथळा येतो. काही अभ्यासानुसार, अन्न व्यवस्थित न पचल्यास इन्सुलिनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढण्याची आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. पचनाची गती मंदावल्यास, अन्न पोटाच्या वरच्या भागात जास्त काळ राहते. यामुळे काही वेळा पोटात तयार झालेले ॲसिड अन्ननलिकेत परत येऊ शकते.
ज्याला ॲसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ म्हणतात. आपले शरीर अन्नातून जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने शोषून घेते. अपूर्ण पचनामुळे, ही महत्त्वाची पोषक तत्त्वे पूर्णपणे शोषली जात नाहीत आणि शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे तुम्ही कितीही पौष्टिक आहार घेतला तरी त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही.
पाणी पिण्याची योग्य वेळ
जेवणानंतर किमान ४५ मिनिटे ते १ तास झाल्यावर पाणी प्यावे. या वेळेत पचनक्रिया आपली प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करते. जेवणापूर्वी ३० मिनिटे पाणी प्यायल्यास पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. जेवण करताना तहान लागल्यास, केवळ एक-दोन घोट (Sips) कोमट पाणी पिणे योग्य आहे, जेणेकरून घसा कोरडा पडणार नाही.