Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सलग १४ दिवस एक कण साखर खाल्ली नाही तर शरीरात काय बदल होतात? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले परिणाम..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:55 IST

Skip Sugar Benefits : जर आपण सलग 14 दिवस साखर खाणं बंद केलं, तर शरीरात लक्षणीय बदल दिसू शकतात. साधारण दोन आठवडे साखर टाळल्याने शरीराची कार्यप्रणाली आणि सिस्टीम पुन्हा सक्रिय होऊ लागते.

Skip Sugar Benefits : साखर शरीरासाठी हळूहळू परिणाम करणारं एक 'स्लो पॉयझन' ठरू शकते, असं अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात. आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे साखर आणि गोड पदार्थांचा समावेश असतो. हळूहळू गोडाची सवय कधी लागते, हे आपल्याला कळतही नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, डायबिटीस आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. मात्र, जर आपण सलग 14 दिवस साखर खाणं बंद केलं, तर शरीरात लक्षणीय बदल दिसू शकतात. साधारण दोन आठवडे साखर टाळल्याने शरीराची कार्यप्रणाली आणि सिस्टीम पुन्हा सक्रिय होऊ लागते.

AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठांतून प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 14 दिवस साखर न खाल्ल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल माहिती दिली आहे.

14 दिवस साखर न खाल्ल्यास काय होते?

तज्ज्ञांच्या मते, 14 दिवस साखर टाळल्यास पोटाच्या आरोग्यासह एकूण आरोग्यालाही अनेक फायदे होतात. बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही की साखर फक्त कॅलरीज वाढवत नाही, तर भूक, खाण्याची ईच्छा, इन्सुलिनची पातळी आणि लिव्हरमध्ये साचणारी चरबी यांवरही परिणाम करते तोही नकळत. त्यामुळे जेव्हा तुम्ही 14 दिवस साखर टाळता, तेव्हा शरीरात खालील बदल जाणवू शकतात.

गोड खाण्याची तीव्र इच्छा

डोकेदुखी

थकवा

चिडचिड

ब्रेन फॉग

हे बदल ब्रेन रिकॅलिब्रेशनमुळे होतात. ही साखरेची कमतरता नसून, शरीर अधिक चांगल्या अवस्थेकडे जात असल्याचे संकेत असतात. हळूहळू क्रेव्हिंग कमी होते, ऊर्जा स्थिर राहते, पोट फुगणे कमी होते, दुपारी येणारा थकवा घटतो आणि इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारतो.

कोणत्या पदार्थांमध्ये जास्त साखर असते?

गोड म्हणजे फक्त साखर नाही. अनेक पदार्थांमध्ये साखर लपलेली असते आणि आपल्याला ते कळतही नाही. खासकरून ड्रिंक्समध्ये अधिक असते. तसेच ज्यूस आणि फ्लेवर्ड योगर्ट, सीरिअल्स आणि एनर्जी बार, सॉस आणि ड्रेसिंग, बेकरी पदार्थ, गोड अल्कोहोलिक ड्रिंक्स या सगळ्यांमध्ये अतिरिक्त साखर मोठ्या प्रमाणात असू शकते.

साखर न खाण्याचे फायदे

जेव्हा तुम्ही आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकता, तेव्हा 14–15 दिवसांतच बदल जाणवू लागतात. जसे की, पोटावरील चरबी कमी होऊ लागते. झोपेची गुणवत्ता सुधारते. खरी भूक कधी लागते याचे संकेत स्पष्ट होतात. वारंवार खाण्याची इच्छा कमी होते. फास्टिंग ग्लुकोजमध्ये सुधारणा दिसते. जरी एवढ्या कमी काळात वजनात फारसा फरक दिसला नाही, तरी मेटाबॉलिझममध्ये सकारात्मक बदल नक्कीच सुरू होतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स