Health Tips : जास्तीत जास्त महिला किंवा पुरूष चेहरा, केस, हात, पायांची काळजी घेण्यासाठी अधिक लक्ष देतात. पण नखांकडे फारसं कुणी लक्ष देत नाहीत. नखं वाढली की, कापणं इतकंच काय ते केलं जातं. पण नखांवरील बदललेला रंग, त्यांवरील डाग या गोष्टी शरीरात नेमकी काय गडबड सुरू आहे याकडे इशारा करत असतात. अनेकदा शरीरात काही पोषक तत्व कमी झाल्यावर नखांमध्ये बरेच बदल बघायला मिळतात. पण नखांमधील हे बदल सामान्य समजून त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. हेच दुर्लक्ष करणं नंतर महागात पडतं. अशात आज आपण पाहणार आहोत की, नखांमधील बदल कोणत्या गोष्टींकडे इशारा करतात.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, जर पायांचे किंवा हातांची नखं पिवळसर पडू लागली, जाड झाली किंवा ठिसूळ झाली, तर ते फंगल इन्फेक्शनसोबतच शरीरात झिंक आणि व्हिटामिन ई कमी झाल्याकडे इशारा करतात. झिंक कमी झाल्यावर नखं कमजोर होतात. तसेच त्यांची वाढही हळू होते. अशात झिंक आणि व्हिटामिन ई मिळवण्यासाठी आहारात नट्स, बिया, हिरव्या भाज्या आणि कडधान्ये यांचा समावेश करावा.
नखांवर पांढरे डाग
नखांवर पांढरे डाग दिसत असतील तर याचा अर्थ अनेकदा कॅल्शियम किंवा झिंकच्या कमी झालंय असा होतो. बरेच लोक याला इजा झाल्याचा परिणाम समजतात, पण हे डाग वारंवार दिसत असतील तर सावध होणे गरजेचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केवळ हाडेच नाही तर नखंही लवकर तुटू लागतात. दूध, दही, पनीर, तीळ आणि हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
नखं पातळ होणे
जर पायांची नखं खूपच पातळ झाली असतील किंवा आतल्या बाजूने वाकलेली दिसत असतील, तर ते आयर्नच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. याला मेडिकल भाषेत कोइलोनायाचिया म्हणतात. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवतो. अशा लक्षणांमध्ये बीट, डाळिंब, पालक, गूळ आणि डाळी आहारात समाविष्ट करणे आवश्यक असते.
नखांवर लांब उभ्या रेषा
वाढत्या वयात नखांवर लांब उभ्या रेषा दिसणं सामान्य समजलं जातं. पण जर कमी वयातच त्या दिसू लागल्यास त्या व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटामिन बी12च्या कमतरतेच्या संकेत असू शकतात. बी12च्या कमतरतेमुळे नखांसोबतच त्वचा फिकट पडते आणि हात-पायांत झिणझिणी येऊ शकतात. यासाठी दूध, दही, अंडी आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थ उपयुक्त ठरतात.
नखांचा रंग निळा किंवा जांभळट दिसणे
जर नखांचा रंग निळसर किंवा जांभळट दिसत असेल, तर ते शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा ब्लड सर्कुलेशन कमी असल्याचं लक्षण असू शकतं. ही स्थिती हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित समस्यांकडेही इशारा करू शकते, त्यामुळे असे बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, नखं खूप कोरडी राहणे आणि वारंवार तुटणे हे शरीरात पाण्याची व आवश्यक फॅटी अॅसिड्सची कमतरता दर्शवते.
