आयुर्वेदानुसार मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यापैकी वात हा सर्वात सूक्ष्म दोष मानला जातो. शरीरातील श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, पचनाची हालचाल, मज्जासंस्थेचे कार्य, सांधे हलणे, विचारांची गती यामागे वाताचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वात संतुलित असेल तर शरीर हलके, सक्रिय आणि मन प्रसन्न राहते. पण तो वाढला की अनेक तक्रारी सुरु होतात. (What exactly does it mean when Vata increases in the body? See if your body gives these signs, causes and remedies)वात म्हणजे नेमकं काय, हे समजून घेतल्याशिवाय त्याची लक्षणे आणि परिणाम कळत नाहीत. जेव्हा आहार, जीवनशैली किंवा वातावरणामुळे हेच गुण शरीरात जास्त प्रमाणात वाढतात, तेव्हा वात दोष वाढतो.
शरीरातील वात वाढण्यामागे अनेक कारणे असतात. खूप वेळ उपाशी राहणे, वेळेवर न खाणे किंवा अति हलका आणि कोरडा आहार घेणे यामुळे वात वाढतो. सतत थंड, रुक्ष पदार्थ खाणे, जसे की कोरडी भाजी, जास्त कच्चे पदार्थ, कुरकुरीत स्नॅक्स यांचाही वातावर परिणाम होतो. अतिशय जास्त चहा–कॉफी पिणे, कमी पाणी पिणे आणि उपवासाचे अतिरेकही वात वाढवू शकतात.
जीवनशैलीदेखील वात वाढण्यास कारणीभूत ठरते. फार उशिरा झोपणे, अपुरी झोप, सतत प्रवास, खूप जास्त कामाचा ताण, चिंता, भीती आणि अस्थिर दिनचर्या यामुळे वात बिघडतो. थंडी, कोरडे वातावरण आणि हिवाळा हा काळ वात प्रकृतीच्या लोकांसाठी अधिक त्रासदायक ठरतो.
वात वाढल्यावर सुरुवातीला शरीर काही सूक्ष्म संकेत देऊ लागते. सांध्यात किरकिर किंवा दुखणे, पोटात गॅस तयार होणे, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, हात-पाय थंड राहणे अशी लक्षणे दिसतात. मन अस्वस्थ राहणे, झोप नीट न लागणे, सतत विचार येणे हीसुद्धा वात वाढल्याची चिन्हे असू शकतात.
वेळीच उपाय केले नाहीत तर वाताचे दुष्परिणाम गंभीर स्वरूप धारण करू शकतात. सततचा वात सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी यासारख्या समस्यांना जन्म देतो. मज्जासंस्थेवर परिणाम होऊन अंगाला मुंग्या येणे, कंबरदुखी पायात उतरणे, चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे अशी लक्षणे वाढू शकतात. पचनशक्ती कमजोर होऊन कायमची बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटदुखी सुरू होते. मानसिक पातळीवर चिंता, चिडचिड, भीती आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.
म्हणूनच वात वाढू न देणे आणि तो वेळेत संतुलित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. उबदार, पचायला हलका पण स्निग्ध आहार, नियमित वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि स्थिर दिनचर्या हे वात संतुलनाचे मुख्य आधार आहेत. शरीराने दिलेले छोटे संकेत वेळेत ओळखले, तर पुढील मोठ्या आजारांपासून स्वत:ला सहज वाचवता येते.
