High BP Sign In Women's : लाइफस्टाईल हल्ली अशी झालीये ना की, धावपळ वाढलीये, कामाचा ताण वाढलाय आणि सोबतच खाण्या-पिण्याच्या सवयी सुद्धा फार बदलल्या आहेत. लोक असे काही बिझी झाले आहेत की, त्यांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासही वेळ नाही. शरीर देत असलेल्या वेगवेगळ्या संकेतांकडे कानाडोळा केला जातोय. याचा परिणाम असा होतो की, वेगवेगळे आजार शरीरात घर करून बसतात. लठ्ठपणा वाढतोय. महिला तर हल्ली वेगवेगळ्या गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकत आहेत. खासकरून हाय बीपीची म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या महिलांमध्ये फारच वेगाने वाढत चाललीये. हाय बीपीची समस्या झाली तर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जी वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. अशात महिलांना माहीत असलं पाहिजे की, हाय बीपीची शरीरात कोणती लक्षणं दिसतात.
सतत डोकेदुखी
हाय ब्लड प्रेशरमध्ये अनेकदा सतत डोकेदुखी होऊ लागते. डोकेदुखीमुळे उलटी किंवा मळमळ अशीही समस्या होऊ शकते. अनेकदा तर डोकं खूप जास्त दुखायला लागतं. त्यामुळे जर आपलं सतत डोकं दुखत असेल, अधूनमधून जोरात दुखत असेल तर वेळीच सावध होण्याची वेळ आहे.
चक्कर येणे
डोकेदुखी सोबतच हाय बीपीची समस्या झाल्यावर चक्करही येऊ लागतात. अनेकदा चक्कर हलकी किंवा खूप जास्त येते. चक्कर येण्यासोबतच डोकं सुद्धा गरगरतं.
डोळे लाल होणं
हाय बीपी झाल्यावर डोळ्यांमध्ये लाल डाग दिसू लागतात. हाय बीपीमुळे डोळ्यांच्या नसांवर वाईट प्रभाव रडतो, ज्यामुळे डोळ्यांमध्ये लाल स्पॉट दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये असा काही बदल दिसत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांना भेटा.
नाकातून रक्त येणं
काही रिपोर्टमधून समोर आलं आहे की, महिलांमध्ये हल्ली हाय बीपीची समस्या फार कॉमन झाली आहे. हाय बीपी झाल्यास नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते. नाकातून अचानक जर रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. बीपी वाढला की, नाकाच्या नसांवर प्रभाव पडतो, ज्यामुळे रक्त येतं.
