पिशवीतील दूध असो किंवा गोठ्यातून आणलेलं गायीचं दूध, घरी आणल्यावर पहिली गोष्ट म्हणजे ते आपण उकळून ठेवतो. दुधामध्ये आढळणारे हानिकारक बॅक्टेरिया निघून जावेत म्हणून उकळणं खूप महत्त्वाचं आहे. पण बाजारात मिळणारं पिशवीतील दूध उकळणं आवश्यक आहे का? पिशवीतील दुधात आढळणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याच्या प्रक्रियेतून गेले आहेत, मग ते घरी पुन्हा पुन्हा उकळणं आवश्यक आहे का? याबाबत जाणून घेऊया...
अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे की, दूध वारंवार उकळल्याने त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात. अशा परिस्थितीत ते पिण्यात काहीच अर्थ नाही. ९० टक्के लोकांना अद्याप दूध उकळवण्याची योग्य पद्धत काय आहे हे माहीत नाही. आपण सर्वजण दुधाला आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पेय मानतो. पण प्रश्न असा पडतो की, आपण खरोखरच पौष्टिकतेने समृद्ध दूध पीत आहोत का? दूध उकळवण्याची योग्य पद्धत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
दूध उकळवण्याची योग्य पद्धत
पिशवीतील दूध पिण्यापूर्वी ते थोडेसं गरम करणं फार महत्त्वाचं आहे. परंतु ते १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उकळू नका. दुधातील पोषक घटक टिकून राहतील याची काळजी घ्या. कच्चं दूध उकळा आणि मग ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. दूध पिण्याआधी, जेवढं दूध प्यायचं आहे तेवढंच दूध घेऊन ते गरम करा. ज्या भांड्यात तुम्ही दूध उकळण्याचा विचार करत आहात ते भांडं आधी पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने दूध भांड्याला चिकटणार नाही.
पिशवीतील दूध वारंवार गरम केल्याचे अनेक तोटे
- पिशवीतील दूध वारंवार गरम केल्याने त्यातील पोषकतत्व नष्ट होऊ लागतात. अशा परिस्थितीत दूध पिण्यात काहीच अर्थ नाही.
- दूध जास्त गरम केल्याने त्यामधील प्रोटीन कमी होतात.
- जास्त गरम केल्याने दुधातील B ग्रुप व्हिटॅमिन्स नष्ट होतात.
- दूध वारंवार गरम केल्याने लॅक्टिक ॲसिड मोठ्या प्रमाणात तयार होतं, त्यामुळे दूध आंबट होऊ लागतं.
- जर दूध मोठ्या आचेवर गरम केलं तर त्याचं तापमान अचानक बदलतं, ज्यामुळे त्याचे प्रोटीन जमा होऊ लागतात आणि दूध फाटतं.