सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये बऱ्याचजणांना झोप आणि झोपेशी संबंधित अनेक समस्या त्रासदायक ठरतात. रात्रीची झोप येत नाही किंवा वारंवार जाग येऊन झोपमोड होते. बरेचदा रात्री पुरेशी आणि शांत झोप मिळत नाही, याचे कारण फक्त मनातील विचार किंवा स्ट्रेस नसून, 'चुकीची झोपण्याची पद्धत' देखील असू शकते. झोपताना आपण नकळतपणे घेतलेली झोपेची स्थिती, आपली पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य आणि रक्तप्रवाहांवर थेट परिणाम करत असते. अनेकदा पाठीवर, पोटावर किंवा एकाच कुशीवर चुकीच्या पद्धतीने झोपल्याने घोरणे, ॲसिडिटी किंवा स्नायूंमध्ये वेदना अशा समस्या वाढतात(What Are the Best Sleeping Positions for a Healthy Body and Mind).
रात्रीची झोपच येत नाही म्हणून आपण झोपेच्या गोळ्या घेतो किंवा चहा - कॉफी सारखे कॅफेनयुक्त पेय पिण्याचे प्रमाण कमी करतो, परंतु इतकेच करुन ही समस्या सुटत नाही. रात्री शांत, गाढ व पटकन झोप येण्यासाठी योग्य कुशीवर झोपणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. झोपताना आपण कोणत्या कुशीवर झोपतो हे देखील झोप लागण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. आपण योग्य पद्धतीने झोपल्यास झोप गाढ लागते, शरीर डिटॉक्स होतं आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं. झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीला सर्वात उत्तम आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले आहे. योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर, चांगली झोप लागण्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे फायदेशीर असते याबद्दल अधिक माहिती शेअर केली आहे(Sleeping on Your Left Side)
१. कोणत्या स्थितीत झोपणे टाळावे ?
१. उजवी बाजू :- हृदयावर थोडा ताण येतो आणि ॲसिडिटीची शक्यता वाढते.
२. पाठीवर झोपणे :- पाठीवर झोपल्याने घोरण्याची समस्या वाढू शकते आणि कंबर दुखी होण्याचा धोका देखील असतो.
३. पोटावर झोपणे :- मणक्यावर ताण येतो, श्वास घेण्यात अडचण होते.
आत्तापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने खात आहात पालेभाज्या! भरपूर पोषण हवं तर ‘अशी’ खा पालेभाजी...
२. कोणत्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर?
उत्तम आणि निरोगी झोपेसाठी, तसेच पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तज्ज्ञ आणि आयुर्वेद 'डाव्या कुशीवर' (Left Side) झोपण्याचा सल्ला देतात.
केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...
३. चांगल्या झोपेसाठी आवश्यक सवयी...
या व्यतिरिक्त, योगगुरू हंसा योगेंद्र यांनी चांगल्या झोपेसाठी आणखी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.
१. रोज वेळेवर झोपा आणि उठा :- दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे जैविक घड्याळ (Body Clock) व्यवस्थित राहते आणि तुम्हालाही त्याच वेळी नैसर्गिकरित्या झोप येऊ लागते.
२. झोपताना आरामदायक कपडे घाला :- खूप घट्ट कपडे घालून झोपल्यास शरीर रिलॅक्स होऊ शकत नाही आणि तुम्हाला रात्रभर अस्वस्थता, बैचेनी जाणवते.
३. झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका :- यातून निघणारा ब्लू लाईट झोपेच्या हार्मोनला (मेलाटोनिन - Melatonin) प्रभावित करतो.
४. योग आणि ध्यान करा :- झोपण्यापूर्वी तुम्ही बालासन (Balasana), विपरीतकरणी यांसारखे हलके योगासन आणि दीर्घ श्वासोच्छ्वास घेण्याचा सराव करू शकता. यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि झोप लवकर येते.
५. रात्री खूप जड जेवण टाळा :- रात्रीच्या जेवणात खूपच जड किंवा तेलकट तुपकट पदार्थ खाल्ल्यास झोपेत अडथळा येतो. अशावेळी रात्री हलके आणि पौष्टिक जेवण करा. याव्यतिरिक्त, झोपण्यापूर्वी किमान ५ तास आधीपर्यंत चहा-कॉफी पिणे टाळा.
डॉक्टर हंसा योगेंद्र म्हणतात की, या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय गाढ, शांत आणि सुखद झोप मिळवू शकता.