आजकाल प्रत्येकाची सकाळ एकाच गोष्टीने सुरू होते. ते म्हणजे डोळे उघडतात मोबाईल थेट हातात. मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. पण सकाळी उठताच मोबाईलकडे पाहण्याची ही सवय आपल्या मेंदूवर, शरीरावर, मूडवर किती खोलवर परिणाम करत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? सतत फोन वापरल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर कसा घातक परिणाम होतो ते जाणून घेऊया...
डोळ्यांवर आणि शरीरावर परिणाम
मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारी ब्लू लाईट डोळ्यांसाठी विषासारखी आहे. सकाळी उठल्या उठल्या पाहिल्यास डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि डोकेदुखी होते. झोपताना मोबाईल वापरल्याने शरीराचं पोश्चर बिघडतं, ज्यामुळे मान आणि पाठ दुखते. ही सवय दीर्घकाळ चालू राहिल्यास मणक्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
स्ट्रेस आणि एंग्जाइटी
सकाळी उठून सोशल मीडिया उघडताच इतरांच्या पोस्ट, भयानक बातम्यांचे मथळे आणि ऑफिसमधून येणारे तणावपूर्ण ईमेल दिसतात. या सर्व गोष्टींमुळे तुमचं मन अस्वस्थ होतं आणि दिवसाची सुरुवात काळजीने होते. जेव्हा तुम्ही जागे होताच मोबाईलची स्क्रीन आणि नोटिफिकेशन पाहता तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता.
मेंदूवर थेट परिणाम
सकाळी आपलं डोकं शांत असतं. चांगल्या गोष्टी आणि सकारात्मक विचारांची ही वेळ असते परंतु जेव्हा तुम्ही जागे होताच स्क्रीनवर विविध गोष्टींचा भडिमार सुरू करता तेव्हा तुमचा मेंदू थकतो. यामुळे तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, निर्णय घेणं कठीण होतं आणि तुमची दिवसभर चिडचिड होते.
एकाग्रतेचा अभाव
मोबाईलच्या व्यसनामुळे तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. सकाळी उठताच स्क्रीनकडे पाहिल्याने तुमचा मेंदू थकतो, ज्यामुळे तुम्ही दिवसभर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि यामुळे कामात चुका होतात, अभ्यासात एकाग्रतेचा अभाव होतो आणि इतर अनेक समस्या उद्भवतात.