Health Research : बऱ्याच लोकांना च्युइंग गम खाण्याची सवय असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेचजण च्युइंग गम तोंडात टाकून तासंतास चघळत राहतात. मात्र, च्युइंग गमबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, च्युइंग गमच्या माध्यमातून शेकडो मायक्रोप्लास्टिकचे तुकडे थेट लोकांच्या तोंडात जातात.
मानवी शरीरात मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं की, आपले फुप्फुसं, रक्त आणि मेंदुतही मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे. च्युइंग गमबाबत करण्यात आलेल्या या रिसर्चचे मुख्य संशोधक संजय मोहंती म्हणाले की, 'मला लोकांना घाबरवायचं नाही'.
लॉस एजंलिसच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे संजय मोहंती म्हणाले की, असा कोणताही पुरावा नाही की, ज्याव्दारे स्पष्टपणे असं म्हणता येईल की, मायक्रोप्लास्टिक मनुष्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.
च्युइंग गमबाबतच्या शोधात पीएचडी अभ्यासक लिसा लोवनं १० वेगवेगळ्या ब्रॅन्डचे सात-सात च्युइंग गम चघळले. त्यानंतर लाळेचं रासायनिक विश्लेषण केलं. ज्यातून असं आढळलं की, एक ग्रॅम च्युइंग गममध्ये सरासरी १०० मायक्रोप्लास्टिकचे तुकडे निघाले. तर काहींमधून ६०० पेक्षा जास्त तुकडे निघतात. एका च्युइंग गमचं वजन सरासरी जवळपास १.५ ग्रॅम असतं. अभ्यासकांनी सांगितलं की, जे लोक वर्षभरात साधारण १८० च्युइंग गम खातात, ते साधारण ३० हजार मायक्रोप्लास्टिक गिळतात.
मोहंती म्हणाले की, मनुष्य इतर माध्यमातूनही च्युइंग गमच्या तुलनेत अनेक पटीनं जास्त मायक्रोप्लास्टिक गिळतात. अभ्यासक म्हणाले की, सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या सगळ्यात कॉमन च्युइंग गमला सिंथेटिक गम म्हटलं जातं. च्युइंग गम चावण्या लायक बनवण्यासाठी त्यात पेट्रोलिअम आधारित पॉलिमर असतं. मात्र, पॅकेटवर प्लास्टिकची माहिती दिली जात नाही.