Sleeping Tips: वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना आजकाल रात्री हवी तशी चांगली झोप लागत नाही. तासंतास बेडवर पडून राहूनही डोळ्याला डोळा लागत नाही. अशात दुसऱ्या दिवशी दिवसभर आळस राहतो. डोळ्यात झोप राहते. असं जर नेहमीच होत असेल तर नक्कीच लठ्ठपणासोबतच आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या डोकं वर काढतात. बरेच लोक गाढ झोप लागण्यासाठी काहीबाही उपाय करत असतातच, पण फायदा मिळेलच असं नाही. अशात आम्ही आपल्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. अमेरिकन डॉक्टर कुनाल सूद यांनी चांगली झोप येण्यासाठी एक खास ट्रि्क सांगितली आहे.
गाढ झोप येण्यासाठी
एनेस्थीसियोलॉजिस्ट आणि पेन मेडिसिन फिजिशियन डॉक्टर कुनाल सूद यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ते सांगतात की, जर आपल्याला नेहमीच रात्री चांगली झोप लागत नसेल तर आपण पीनट बटर खाऊ शकता. पीनट बटरमधील वेगवेगळे पोषक तत्व मेंदू शांत करतात आणि चांगली झोप येण्यासही मदत करतात.
कसा मिळतो फायदा?
ट्रिप्टोफॅन
डॉक्टरांनुसार, पीनट बटरमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं एक अमीनो अॅसिड असतं. जे शरीरात सेरोटोनिन हार्मोन्स तयार करण्यास मदत करतं. सेरोटोनिनने मेंदू शांत राहतो, तणाव कमी होतो आणि झोप येण्यास मदत मिळते. हेच कारण आहे की, पीनट बटर खाल्ल्यानंतर शरीराला आराम मिळतो.
हेल्दी फॅट
पीनट बटरमध्ये असलेल्या गुड फॅटने ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहण्यास मदत मिळते. रात्री अनेकदा ब्लड शुगर लेव्हल कमी झाल्याने किंवा वाढल्याने झोपमोड होते. पीनट बटर कार्बोहायड्रेटचं अॅब्जॉर्बशन हळू होतं, ज्यामुळे ब्लड शुगरमध्ये चढउतार होत नाही आणि झोप चांगली लागते.
मॅग्नेशिअम
पीनट बटरमध्ये मॅग्नेशिअमही असतं. जे नर्वस सिस्टीमला शांत करतं. याने शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते.
कधी आणि किती खावं?
डॉक्टर सूद यांचा सल्ला आहे की, झोपण्याच्या कमीत कमी २ तास आधी एक चमचा पीनट बटर खाऊ शकता. असं केल्यास शरीराला ते पचवण्यास वेळ मिळतो आणि झोपेवर चांगला प्रभाव पडतो.
काय काळजी घ्याल?
डॉक्टर म्हणाले की, पीनट बटर सगळ्यांवर एकसारखा प्रभाव करत नाही. जर कुणाला शेंगदाण्यांची अॅलर्जी असेल किंवा पचनासंबंधी समस्या असेल तर हे खाऊ नका.
