Urine Changes Causes : आपण सगळेच म्हणजे महिला, पुरूष सगळेच रोज कितीतरी वेळा लघवी करतो. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामुळे असं दिसून येतं अनेक लोक याकडे फारसं लक्षच देत नाही. म्हणजे लघवीचा रंग बदलतोय का, लघवी करताना जळजळ-वेदना होतात का, जास्त वेळ लघवी लागते का या गोष्टींकडे फारसं गांभीर्यानं पाहिलंच जात नाही. आणि इथे आपल्या हातून मोठी चूक होते. कारण लघवीसंबंधी या गोष्टीच आपल्या शरीरात काय गडबड आहे, कोणता आजार आहे का यासंबंधी इशारा देत असतात. ज्याकडे कानाकोळा केला तर महागात पडू शकतं. अशात आज आपण लघवीतील या बदलांचे संकेत काय असतात हे समजून घेऊ. म्हणजे आपल्याला वेळीच योग्य ती काळजी घेता येईल.
न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरील एका व्हिडीओत लघवीचा रंग, दुर्गंधी आणि फ्रीक्वेंसीहीत बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याद्वारे शरीरातील आजारांची माहिती मिळू शकते.
पुन्हा पुन्हा लघवी का बरे येत असेल?
आपल्याला जर अचानक रोजच्यापेक्षा जास्त वेळ लघवीला जावं लागत असेल याचा संबंधी डायबिटीससोबत जोडला जातो. पण हा संकेत केवळ डायबिटीसचाच असतो असं नाही तर आपल्याला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय इन्फेक्शन सुद्धा झालेलं असू शकतं. तसेच जास्त चहा, कॉफी आणि दारू प्यायल्याने सुद्धा जास्त लघवी येते.
रंगात बदल कशामुळे होतो?
लघवीच्या रंगात बदल झाला तर हा वेगवेगळ्या गोष्टींचा संकेत असू शकतो. जसे की, जर लघवीचा रंग डार्क पिवळा असेल तर सामान्यपणे डिहायड्रेशन, लिव्हर डिजीज, काविळ, जास्त घाम येणे किंवा व्हिटामिन बी अधिक इनटेक केल्याचे संकेत असू शकतात. तेच जर आपल्याला लाइट किंवा पारदर्शक लघवी येत असेल तर आपण स्वत:ला ओवरहायड्रेट करत आहात. इतकंच नाही तर डायबिटीसचा सुद्धा इशारा असू शकतो. नाही तर हा रंग किडनी डॅमेजकडेही इशारा करतो.
फेस येण्याचं काय असेल कारण?
अनेकदा आपण पाहात असाल की, लघवी करताना फेस येतो, तर हा किडनीमधून प्रोटीन बाहेर पडत असल्याचा संकेत असू शकतो. या संकेताकडे अजिबात कानाडोळा करू नये.
लघवीतून रक्त येणे
काही लोकांच्या लघवीतून रक्तही येऊ लागतं. ही मोठी गंभीर समस्या असू शकते. ही समस्या किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा किडनीच्या एखाद्या आजारामुळे होऊ शकते. इतकंच नाही तर लघवीतून रक्त येणं कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं.
दुर्गंधी येणे
लघवीतून घाणेरडा वास येत असल्यास याची कारणं इन्फेक्शन, डिहायड्रेशन, लिव्हरसंबंधी आजार किंवा काही खाद्यपदार्थांमुळे असू शकतात. मीठासारखा गोड वास येत असल्यास ब्लड शुगर वाढल्याचं लक्षण असू शकतं. अशात भरपूर पाणी प्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जळजळ होणे
लघवी करताना जर जळजळ होत असेल तर हे यूरिनरी इन्फेक्शन, किडनी स्टोन, अस्वच्छता किंवा लैंगिक संक्रमित आजारांशी संबंधित लक्षणं असू शकते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांकडे तातडीने जा.