चमचमीत, चटकदार पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. पण हे शरीरासाठी जास्त घातक असल्याचं आता समोर आलं आहे. रेस्पिरेटरी जर्नल थोरॅक्समध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सर्वाधिक सेवन करणाऱ्या लोकांना कमीत कमी सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका ४१% जास्त असतो. १२ वर्षे १००,००० हून अधिक अमेरिकन लोकांच्या डेटावर आधारित निष्कर्षांवरून असं दिसून येतं की, रेडी टू ईट फूड, प्रोसेस्डफूड आणि शुगर ड्रिंक याचं प्रमाण कमी केल्यास जगातील सर्वात सामान्य कॅन्सरचा जागतिक भार कमी होण्यास मदत होऊ शकते.
रिसर्चनुसार, फक्त २०२० मध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरने जगभरात १८ लाख लोकांचा बळी घेतला. त्यावर्षी २२ लाख रुग्ण समोर आले होते. या रिसर्चमध्ये १९९३ ते २००१ दरम्यान अमेरिकेतील प्रमुख कॅन्सर तपासणी चाचण्यांचा भाग म्हणून ५५-७४ वयोगटातील १,५५,००० लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलें. संशोधकांनी २००९ पर्यंत कॅन्सरचं निदान आणि २०१८ पर्यंत मृत्यूंवर नजर ठेवली होती.
अन्नपदार्थांचे चार प्रक्रिया श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आलं. प्रक्रिया न केलेलं किंवा कमीत कमी प्रक्रिया केलेले, प्रक्रिया केलेले स्वयंपाकाचे घटक असलेले, प्रक्रिया केलेले आणि अल्ट्रा-प्रक्रिया केलेले. तपासलेल्या अल्ट्रा-प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये दुपारच्या जेवणात आईस्क्रीम, तळलेले पदार्थ, नाश्ता, धान्य, इन्स्टंट नूडल्स, दुकानातून खरेदी केलेलं सूप, सॉफ्ट ड्रिंक्स, हॅम्बर्गर आणि पिझ्झासारख्या फास्ट-फूड आयटमचा समावेश होता.
फॉलो-अप कालावधीत, १,७०६ लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला - नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कॅन्सरचे १,४७३ रुग्ण आणि स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कॅन्सरचे २३३ रुग्ण आढळले. धूम्रपानाच्या सवयी आणि एकूण आहाराच्या गुणवत्तेचा विचार केल्यानंतरही, सर्वाधिक सेवन करणाऱ्या गटातील लोकांमध्ये लक्षणीयरीत्या धोका वाढलेला दिसून आला. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड ग्राहकांमध्ये नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका ३७% आणि स्मॉल सेल फुफ्फुसाच्या कॅन्सरचाधोका ४४% वाढला.
गेल्या दोन दशकांमध्ये विकास किंवा आर्थिक स्थिती काहीही असो, जगभरात अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. ही वाढ लठ्ठपणा, हृदयरोग आणि कॅन्सर यांच्या रुग्णसंख्येत वाढ घडवून आणत असू शकते असंही म्हटलं आहे. इंडस्ट्रीयल प्रोसेसमुळे अन्नाची रचना देखील बदलते, ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण होतं यावर परिणाम होतो आणि त्याचबरोबर अॅक्रोलिन सारखे हानिकारक कम्पाऊंड तयार होतात - जे ग्रील्ड सॉसेज आणि कॅरॅमल मिठाईंमध्ये आढळतात आणि सिगारेटच्या धुरात देखील आढळतात. फूड पॅकेजिंग मटेरियलमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकत असंही रिसर्चमध्ये म्हटलं आहे.