थंडीचे दिवस सुरु होताच शरीरातील कोरडेपणा वाढतो आणि त्याचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर जाणवतो. चेहऱ्याची किंवा हाताचीच नाही तर पायाच्या त्वचेवरही परिणाम होतो. दिवसभर चालणे, थंड जमिनीचा स्पर्श आणि त्वचेत कमी होणारे नैसर्गिक तेल यामुळे पाय कोरडे पडतात आणि भेगा पडू लागतात. (Try this remedy - You will not suffer from asthma, body aches, or muscle aches, and you will also sleep soundly)अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तेल लावणे हा अगदी जुना, साधा पण अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. हे फक्त पायांना मऊ करण्यापुरते मर्यादित नसून त्याचे अनेक आरोग्यदायी परिणाम शरीरभर जाणवतात.
सर्वप्रथम, पायांना लावलेले तेल तळव्यांतील कोरडेपणा कमी करते आणि त्वचा मऊ करते. सतत होत असलेले घर्षण, धूळ आणि थंडीमुळे तळव्यांची बाहेरची त्वचा जाड होते, पण तेलामुळे तिचे संरक्षण होते आणि भेगा लवकर भरून येतात. तूप, तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल यांच्यामुळे पायांच्या त्वचेत खोलपर्यंत उब जाणवते आणि तिथल्या पेशींना ओलावा मिळतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाय मऊ, हलके आणि आरामदायी वाटतात.
तेलाने तळव्यांवर हलका मसाज करायचा. तळव्यात अनेक ताणतणावाचे बिंदू असतात, त्यांच्यावर उबदार तेलाचा स्पर्श झाल्यावर मेंदू शांत होतो आणि झोप सहज येते. थंडीमध्ये वारंवार जाणवणाऱ्या थंडीला पळवून लावण्यासाठी हा उपाय मस्त आहे. तसेच पायाला तेल लावणे संपूर्ण शरीराला आराम देते. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे संपूर्ण शरीराला हलका ऊबदारपणा मिळतो आणि झोप अधिक गाढ लागते.
याशिवाय, तळव्यांवर तेल लावल्याने वातही कमी होतो. दिवसभर चालण्याने किंवा उभे राहील्यावर पायांना सूज येते पण रात्री झोपताना तळव्यांमध्ये तेल मुरल्याने सकाळी पाय हलके वाटतात. काही लोकांना थंडीत वारंवार पाय दुखणे, बधीरपणा किंवा स्नायूंचा त्रास होतो, तेलामुळे तो त्रासही कमी होतो. तळव्यांवरचे तेल शरीरातील वात कमी करते. यामुळे कोरडेपणा, कडकपणा आणि रात्री झोप न लागल्यामुळे होणारी अस्वस्थता कमी होते.
थोडक्यात, रात्री झोपण्यापूर्वी पायांना तेल लावणे हा थंडीतील एक सहज, नैसर्गिक आणि अत्यंत उपयुक्त उपाय आहे. त्वचा मऊ ठेवण्यापासून, भेगा कमी करण्यापर्यंत, झोप छान लागेपर्यंत आणि शरीर शांत ठेवण्यापर्यंत एका छोटा उपाय मोठे फायदे देतो. या उबदार सवयीने थंडी अधिक सुखकर होते आणि शरीराला मिळतो एक शांत, समाधानकारक विसावा.
