आपण अनेकदा ऐकलं आहे की, जास्त वजनामुळे अनेक समस्या उद्भवतात आणि या समस्या जीवघेण्या आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतात. मात्र, लेटेस्ट रिसर्चमध्ये असा दावा केला आहे की, थोडं जास्त वजन तुमचं आयुष्य कमी करू शकत नाही, परंतु खूप बारीक असणं धोक्याचं आहे. ८५,००० हून अधिक लोकांवर केलेल्या डॅनिश अभ्यासात असं आढळून आलं की १८.५ पेक्षा कमी BMI असलेल्या लोकांमध्ये २२.५ ते २४.९ BMI असलेल्या लोकांपेक्षा अकाली मृत्यू होण्याची शक्यता जवळजवळ तिप्पट असते.
१८.५ ते २४.९ BMI सामान्यतः निरोगी मानले जाते, परंतु रिसर्चमध्ये असंही दिसून आलं आहे की या रेंजपेक्षा कमी असलेल्यांना धोका असतो. खरं तर १८.५ ते १९.९ BMI असलेल्यांना मृत्यूचा धोका दुप्पट होता, तर २० ते २२.४ BMI असलेल्यांना २७% वाढला होता. हे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत, कारण साधारणपणे १८.५ ते २४.९ दरम्यानचा बीएमआय चांगला मानला जातो.
जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांमध्ये (बीएमआय २५ ते ३५), ज्यांना पूर्वी त्यांच्या वजनामुळे जास्त धोका असल्याचं मानलं जात होतं, त्यांना मृत्यूचा धोका जास्त नव्हता. फक्त ४० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्यांनाच मृत्यूचा धोका दुप्पट होता. याचा अर्थ असा की थोडं जास्त वजन असलेल्यांनी असं गृहीत धरू नये की त्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे.
तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, खूप बारीक लोकांमध्ये फॅट कमी स्टोर होतात आणि जेव्हा गंभीर आजार किंवा उपचार (जसे की कर्करोगाच्या केमोथेरपी दरम्यान वजन कमी होणे) होतात तेव्हा शरीराला रिकव्हरीसाठी साठवलेल्या फॅटची आवश्यकता असते. ज्या लोकांमध्ये पुरेसे फॅट नसतात त्यांचं शरीर लवकर कमकुवत होतं आणि महत्त्वाचे अवयव योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. म्हणून जास्त बारीक असणं हे घातक असू शकतं.
संशोधकांचं म्हणणं आहे की, बीएमआय हे केवळ उंची आणि वजनावर आधारित कॅल्यूलेशन आहे. यामध्ये शरीरातील फॅट डिस्ट्रीब्यूशन, डाएट, लाइफस्टाईल किंवा जेनेटिक फॅक्टरचा विचार केला जात नाही आणि म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीसाठी BMI हा अचूक मापन असू शकत नाही. डॅनिश संशोधकांचा असा विश्वास आहे की सुरक्षित BMI रेंज आता २२.५ ते 3३० दरम्यान मानली जाते. याचा अर्थ असा की थोडं जास्त वजन असणं हानिकारक नाही.