जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल आणि तुम्ही बराच वेळ अंथरुणावर कूस बदलत राहत असाल, तर सकाळी उठल्यावर डोकं जड होणं आणि स्वभाव चिडचिडा होणं स्वाभाविक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईलचा अतिवापर, मानसिक ताण आणि अनियमित दिनचर्या यामुळे निद्रानाश म्हणजेच झोप न येण्याची समस्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक अनेकदा झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात, ज्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
आयुर्वेदाशी संबंधित व्यासपीठांवर सध्या एका उपायाची जोरदार चर्चा रंगली आहे. असा दावा केला जात आहे की, हा उपाय ऋषी-मुनींच्या काळापासून चालत आला आहे. हा उपाय एका २२ वर्षीय तरुणाने शेअर केला असून तो प्राचीन आयुर्वेदातील असल्याचं सांगितलं जात आहे. या उपायामुळे कोणत्याही गोळीशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय गाढ झोप येऊ लागते, असं म्हटलं जात आहे.
बदाम
रात्री झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी एक खास मिश्रण तयार करावं लागतं. यासाठी एक ग्लास कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा ब्राह्मी पावडर किंवा अश्वगंधा पावडर मिसळावी. त्यासोबत ४-५ बदाम (जे आधी भिजवून, त्यांची साल काढून वाटून घेतलेले असावेत) या मिश्रणात टाकावेत. त्यानंतर त्यात एक चिमूट जायफळ पावडर आणि वरून एक चमचा मध टाका.
१० मिनिटांच्या आत येते झोप
हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून प्यायल्यानंतर, अंथरुणावर झोपून सुमारे ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो. असं म्हटलं जात आहे की, जर हा उपाय सलग ७ दिवस केला, तर रात्री १० मिनिटांच्या आत झोप येऊ लागते. सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटतं, तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं. तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते, असा दावाही केला जात आहे.
डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीची शरीरयष्टी वेगळी असते. कोणतेही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगलं. विशेषतः जर तुम्हाला आधीच एखादा आजार असेल तर अधिक काळजी घ्या. झोपेच्या समस्येशी सामना करणाऱ्या लोकांसाठी हा सोपा उपाय आहे.
