Constipation Home Remedy : आपल्या शरीरानं योग्यपणे काम करण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. पण यासाठी रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ होणं सुद्धा महत्वाचं असतं. पण भरपूर लोक असे असतात ज्यांचं रोज पोट व्यवस्थित साफ होत नाही. आणि पोट जर साफ झालं नाही तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. आता पोट का साफ होत नाही, यालाही आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात. जसे की, भरपूर पाणी न पिणे, फायबर असलेल्या गोष्टी न खाणे, फास्ट फूड - जंक फूड अधिक खाणे. इतकंच नाही तर तणाव, चिंतेमुळेही पोट साफ होण्यास अडचण येते.
जर आपल्याला सुद्धा नेहमीच पोट साफ न होण्याची समस्या होत असेल आणि यावर काही उपाय शोधत असाल तर आम्ही आपल्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत. काही दिवस हा उपाय केला तर रोज पोट पटापट साफ होईल आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होईल. खास बाब म्हणजे हा उपाय करण्यासाठ किचनमधील काही गोष्टींची गरज लागेल.
ओवा सगळ्यात बेस्ट
ओवा पोटासाठी खूप फायदेशीर असतो जर दह्यात ओवा टाकून खाल्ला तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या झटक्यात दूर होऊ शकतात. आपल्याला फक्त एक वाटी दह्यात एक चमचा ओव्याचं पावडर आणि चिमुटभर काळं मीठ टाकायचं आहे. हे खाल्ल्यानं पचन चांगलं होतं आणि पोटही लगेच साफ होतं.
त्रिफळाचूर्णही रामबाण
पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी त्रिफळाचूर्णही सुद्धा खूप फायदेशीर असतं. गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी अशा समस्या या त्रिफळाचूर्णाने दूर होतात. कारण यात आवळा, हिरडा आणि बेहडा असं मिश्रण असतं. रात्री झोपण्याआधी दह्यात एका चमचा त्रिफळा पावडर टाकून खा. यानं आतड्यांची सफाई होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
ईसबगोलही फायदेशीर
आयुर्वेदातही ईसबगोलला पोटासाठी खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. ईसबगोलमध्ये इनसोल्युबल आणि सॉल्यूबल फायबर असतं. ज्यामुळे विष्ठा नरम होते. तसेच आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियाही वाढतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी एक चमचा दह्यात ईसबगोल टाकून खा आणि वरून कोमट पाणी प्या.
काय काळजी घ्याल
जर आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या दूर करायची असेल तर दही खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. खासकरून शिळं दही खाऊ नका. ज्यांना सर्दी आहे, खोकला आहे त्यांनी दह्यात थोडं काळं मीठ टाका. तसेच जास्त जड आणि तेलकट खाणंही टाळलं पाहिजे.