Tilak Varma Health : भारतीय क्रिकेटमधील स्टार, तरूण आणि धडाकेबाज खेळाडू तिलक वर्मा याच्याबाबत आलेल्या बातमीने चाहत्यांना आणि टीम मॅनेजमेंटला मोठा धक्का दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीदरम्यान अचानक असह्य वेदना झाल्यानंतर तिलक वर्मा याच्यावर इमरजन्सी सर्जरी करावी लागली. या अचानक झालेल्या ऑपरेशनमुळे आता न्यूझीलँडविरुद्धची टी-20 मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याचा सहभाग होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच त्याच्या चाहत्यांना असाही प्रश्न पडला आहे की, तिलकला नेमका कोणता आजार झालाय? तेच आज जाणून घेणार आहोत.
नेमकं तिलक वर्माला काय झालं?
बंगालविरुद्धच्या सामन्यादरम्यान तिलक वर्माला टेस्टिक्युलर टॉर्शन (Testicular Torsion) ही गंभीर अवस्था झाली. मेडिकल भाषेत सांगायचं तर, ही एक अत्यंत गंभीर आपत्कालीन स्थिती आहे. यात अंडकोषाला रक्तपुरवठा करणारी नस अचानक वळते किंवा गुंतते. त्यामुळे त्या भागात जाणारा रक्तप्रवाह थांबतो आणि तीव्र वेदना तसेच मोठी सूज येते. वेळेत उपचार न झाल्यास अंडकोषाला कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो. सुदैवाने, तिलक वर्माला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी वेळ न घालवता त्याची यशस्वी सर्जरी केली.
कुणाला असतो जास्त धोका?
ही स्थिती वयाच्या कोणत्याही टप्प्यात होऊ शकते. पण सामान्यपणे १२ ते १८ वयोगटातील तरूणांमध्ये ही समस्या कॉमन बघायला मिळते. वेळीच जर यावर लक्ष दिलं नाही आणि उपचार घेतले नाही तर समस्या पुढे आणखी गंभीर होऊ शकते.
बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?
सर्जरी यशस्वी झाल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिलक वर्माचं मैदानावर पुनरागमन कधी होईल? सामान्यतः अशा सर्जरीनंतर प्राथमिक जखम भरून येण्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. मात्र क्रिकेटसारख्या उच्च शारीरिक क्षमतेची मागणी करणाऱ्या खेळात पुनरागमन करण्यासाठी शरीर पूर्णपणे वेदनामुक्त आणि लवचिक असणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यावसायिक खेळाडूला पूर्णपणे मॅच-फिट होण्यासाठी आणि मैदानावर धावणे, उडी मारणे किंवा डाइव्ह घेणे शक्य होण्यासाठी ३ ते ४ आठवडे, म्हणजेच साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.
