Symptoms of thyroid in children: जास्तीत जास्त केसेसमध्ये महिलांनाच थायरॉईडची समस्या अधिक बघायला मिळते. पण आजकाल थायरॉईडची समस्या फक्त महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पुरुषांबरोबरच लहान मुलांमध्येही थायरॉईडचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पूर्वी थायरॉईड हा आजार प्रामुख्याने मोठ्यांचा म्हणजेच जास्त वय असलेल्यांचा मानला जात होता, मात्र आता मुलांमध्येही हायपोथायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड कमी तयार होणे आणि हायपरथायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड जास्त तयार होणे या दोन्ही स्थिती आढळतात. अशात डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी एका वेबसाईटला माहिती दिली की, मुलांमध्ये थायरॉईड असल्यास कोणती लक्षणे दिसतात आणि पालकांनी काय काळजी घ्यावी.
मुलांमध्ये थायरॉईडची लक्षणं
मुलांमध्ये थायरॉईड ओळखणं थोडं अवघड असू शकतं, कारण याची लक्षणे अनेकदा सामान्य समस्यांसारखी वाटतात.
वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं
मुलाचं वजन अचानक खूप वाढणं किंवा झपाट्याने कमी होणं हे थायरॉईडचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे मुलांच्या वजनाकडे नियमितपणे लक्ष द्यावे.
सतत सुस्तपणा किंवा चिडचिड
मुलं कायम थकलेली, आळशी किंवा कारण नसताना चिडचिडी वाटत असतील, तर हे खासकरून हायपोथायरॉईडिझमचं लक्षण असू शकतं. थायरॉईडच्या असंतुलनामुळे शारीरिक वाढ मंदावते आणि वर्तनात बदल दिसू शकतात.
केस गळणं आणि कोरडी त्वचा
मुलांचे केस जास्त प्रमाणात गळणं, त्वचा खूप कोरडी होणं हेही थायरॉईडची चिन्हे असू शकतात. लहान मुलांमध्ये उंची न वाढणं किंवा बोलायला उशीर होणं हे देखील इशारे मानले जातात.
लक्षणे दिसल्यास काय करावे?
ही लक्षणे दीर्घकाळ दिसत राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साध्या ब्लड टेस्टच्या माध्यमातून थायरॉईडची तपासणी करता येते. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास मुलांचा शारीरिक व मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्यात आणि वागण्यात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
