शरीरातील पित्ताचे प्रमाण संतुलित राहणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. पित्त वाढले की अॅसिडिटी, छातीत जळजळ, तोंडाला कडू चव येणे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, चिडचिड होणे असे त्रास जाणवू लागतात. सतत उलट्या होतात. अपचन होते. (These foods in your daily diet increase acidity rapidly, you will vomit and have headaches - see what to avoid eating)अनेक वेळा आहारातील काही पदार्थ पित्त वाढण्यास कारणीभूत ठरतात. रोजच्या जेवणात हे पदार्थ जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळेला घेतले गेले तर पित्ताचा त्रास वाढू शकतो.
पित्त वाढवणारा पहिला पदार्थ म्हणजे पावटा. पावट्यामध्ये उष्ण गुणधर्म असतात. तो जड आणि पचायला अवघड असल्यामुळे शरीरात उष्णता वाढवतो आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना तो विशेष त्रासदायक ठरु शकतो. पावटा जास्त तेलात किंवा मसालेदार भाजीच्या स्वरुपात खाल्ल्यास पित्त अधिक वाढते. त्यामुळे पावटा , वाल असे पदार्थ खाताना काळजी घ्या.
दुसरा पदार्थ म्हणजे नारळ. नारळ थंड मानला जात असला तरी काही लोकांमध्ये तो पित्त वाढवू शकतो, विशेषतः सुका नारळ किंवा जास्त प्रमाणात नारळाचा वापर केला तर. नारळ पचायला जड असल्यामुळे पचनावर ताण येतो आणि त्यामुळे अॅसिडिटी, जळजळ यासारखे त्रास वाढू शकतात. विशेष म्हणजे भाजीच्या फोडणीत घातलेला नारळ पित्तासाठी चांगला नाही. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना तो बाधतो.
तिसरा पदार्थ म्हणजे तिखट आणि मसालेदार पदार्थ. मिरची, लाल तिखट, गरम मसाले, मिरची पावडर यांचा जास्त वापर केल्यास शरीरातील उष्णता वाढते. यामुळे पित्त प्रचंड प्रमाणात वाढून पोटात जळजळ, घशात कडूपणा आणि छातीत दाह होण्याचा त्रास होतो. म्हणून अति मसालेदार खाणे टाळा.
चहा क कॉफी जास्त पित असाल तर त्यामुळेही पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे चहा कॉफी कमी प्रमाणात प्या. सकाळी आधी काहीतरी खा नंतर चहा - कॉफी प्या. त्यामुळे पित्त वाढत नाही आणि त्रास होत नाही. दिवसातून किती वेळा चहा पिता यावर नियंत्रण ठेवा.
इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे पित्त वाढते. तुम्हाला काय खाल्यावर पित्ताचा त्रास होते याचे निरिक्षण करा. त्यानुसार आहार ठरवा. कारण पित्त वाढणे म्हणजे एका अर्थी आजारपणच आहे. डोके दुखणे, उलट्या होणे, झोप न लागणे असे त्रास होतात. त्यामुळे पित्ताच्या त्रासाकडे शुल्ल्क समजून दुर्लक्ष करु नका.
