Join us

रात्री झोपताना घाम येणं हे 'या' ५ गंभीर आजारांचे संकेत; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:07 IST

रात्री झोपताना अधूनमधून घाम येणं सामान्य आहे. पण जर ही समस्या वारंवार होत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका.

रात्री झोपताना अधूनमधून घाम येणं सामान्य आहे. पण जर ही समस्या वारंवार होत असेल तर चुकूनही दुर्लक्ष करू नका. हा अनेक गंभीर समस्यांकडे इशारा आहे. काही लोकांना हिवाळ्यातही रात्री घाम येतो, जो शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि खरं कारण शोधून वेळेवर उपचार घ्यावेत. 

हायपरथायरॉईडीझम

हायपरथायरॉईडीझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करते. यामुळे मेटाबॉलिज्म गतिमान होतं, ज्यामुळे शरीराचं तापमान वाढू शकतं आणि रात्री झोपताना घाम येऊ शकतो. जर तुम्हाला रात्री खूप घाम येत असेल तर एकदा तुमची थायरॉईड लेव्हल चेक करा.

मधुमेह

मधुमेह असलेल्या रुग्णांच्या रक्तातील शुगर लेव्हल रात्री अचानक कमी होऊ शकते, ज्यामुळे रात्री घाम येऊ शकतो. या स्थितीला हायपोग्लायसेमिया म्हणतात. जर तुम्हाला रात्री झोपताना खूप घाम येत असेल, तर तुम्ही तुमची शुगर लेव्हल  नक्कीच तपासली पाहिजे.

हृदयाशी संबंधित आजार

रात्री झोपताना घाम येणं हे हृदयरोग किंवा हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला छातीत दुखणं किंवा रात्री घाम येणं यासारख्या समस्या येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि  तपासणी करा. 

मेनोपॉझ

हार्मोनल बदलांमुळे मेनोपॉझ दरम्यान महिलांमध्ये रात्री घाम येणं सामान्य आहे. या काळात, महिलांना शरीरात उष्णता जाणवणे, अस्वस्थता आणि निद्रानाश यांसारखी लक्षणं देखील जाणवतात.

कॅन्सर 

रात्री घाम येणं हे कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराचं लक्षण असू शकतं. ब्लड कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर यासारख्या काही प्रकारच्या कॅन्सरमुळे रात्री जास्त घाम येऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य