Poor Blood Circulation Symptoms : आपले शरीर म्हणजे एकप्रकारे मशीनच असतं. ज्याचे वेगवेगळे पार्टस म्हणजेच अवयव आपापली कामे करत असतात. यात एक सगळ्यात महत्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे ब्लड सर्कुलेशन म्हणजे रक्तप्रवाह. ब्लड सर्कुलेशन जर सुरळीत असेल तर शरीर व्यवस्थित काम करतं. पण यात जर काही अडथळा आला तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. याची काही लक्षणं सगळ्यात आधी पायांवर दिसू लागतात.
धमण्यांमध्ये ब्लॉकेज होणे, डायबिटीस, नसांमध्ये ताण किंवा नुकसान यांसारख्या कारणांमुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. याकडे जर वेळेत लक्ष दिलं नाही तर समस्या गंभीर होऊ शकते. अशात पाहुयात की, ब्लड सर्कुलेशनमध्ये काही गडबड असेल तर काय लक्षणे दिसतात.
टाचा आणि पायांमध्ये सूज येणे
जेव्हा ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही, तेव्हा फ्लुइड टाच आणि पायांच्या टिश्यूजमध्ये साचतं, याला एडीमा म्हणतात. ही सूज जास्त वेळ बसून राहिल्यावर किंवा उभं राहिल्यावर अधिक वाढते. त्वचेवर बोटाने दाबल्यावर खड्डा पडल्यासारखं वाटणं हे त्याचं सामान्य लक्षण आहे. अशा प्रकारची सूज हृदयाची कमजोरी, किडनीच्या समस्या किंवा नसा कमजोरीचे संकेत असू शकतात.
पाय नेहमीच थंड राहणे
जर तुमचे पाय नेहमी थंड असतील किंवा इतरांना स्पर्श केल्यावर थंड वाटत असतील, तर हा ब्लड सर्कुलेशन कमी झाल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा पायांपर्यंत गरम रक्त नीट पोहोचत नाही, तेव्हा पाय थंड राहतात. ही समस्या थायरॉइड किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) मध्ये सामान्यपणे आढळते.
स्नायूंमध्ये वेदना
ब्लड सर्कुलेशन जर सुरळीत होत नसेल तर मांडी, पोटऱ्या किंवा तळपायात अचानक क्रॅम्प येतात किंवा वेदना होतात. हे क्रॅम्प सामान्यपणे रात्री झोपेत किंवा व्यायाम करताना येतात. जेव्हा स्नायूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा ते आकुंचन पावतात आणि त्यामुळे वेदनादायक क्रॅम्प येतो.
काय कराल बचाव?
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम हा ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. त्यात वेगानं चालणे, स्विमिंग, सायकल चालवणे किंवा जॉगिंग यांसारख्या एरोबिक व्यायामांचा समावेश आहे. या व्यायामांनी हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरभर रक्तप्रवाह सुरळीत होतो.
पौष्टिक आहार घ्या
आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, कारण मिठामुळे शरीरात सूज वाढते. पॅकेज्ड, प्रोसेस्ड आणि जंक फूड टाळा. त्याऐवजी ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या, धान्ये आणि अँटी-ऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
स्नायूंसाठी व्यायाम
पोटऱ्यांच्या स्नायूंना शरीराचं 'दुसरं हृदय' म्हटलं जातं, कारण हे स्नायू पायांमधील रक्त परत वर हृदयाकडे ढकलण्यास मदत करतात. म्हणून टो-राइज सारखे व्यायाम करा, जे पोटऱ्यांना मजबूत ठेवतात.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर पायांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही लक्षणे पेरिफेरल आर्टरी डिसीज, डायबिटीस किंवा हृदयविकारांचे संकेत असू शकतात. वेळेत उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते.