Join us
Daily Top 2 Weekly Top 5

world health day theme 2026 : तब्येतीचे तीन तेरा वाजतील, व्हायरल उपचार टाळा-नाहीतर पस्तावाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 06:05 IST

The World Health Day 2026 theme : Together for health. Stand with science! avoid self medication : world health day theme 2026 : जागतिक आरोग्य दिन : स्वत:च स्वत:वर ऑनलाइन उपचार करताय का? खोटी माहिती टाळा..

-नितांत महाजन आजारी पडलात की तुम्ही काय करता? आता हा काय प्रश्न झाला का? तुम्ही म्हणाल की आम्ही डॉक्टरकडे जातो. हे उत्तर हल्ली अर्धसत्य झालं आहे. खरं उत्तर आहे की लोक आता गुगल आणि एआयला आपल्या आजाराविषयी आणि लक्षणांविषयी विचारु लागले आहेत. घरगुती असरदार उपाय म्हणून तज्ज्ञ नसलेल्या लोकांचेही रिल व्हायरल होत काहीही उपाय केले जातात आणि ते घातक आहे.(The World Health Day 2026 theme :  Together for health. Stand with science! avoid self medication.) म्हणूनच यंदाच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्य दिनाची संकल्पनाच आहे, “Together for health. Stand with science”. “वन हेल्थ” या दृष्टिकोनावर विशेष भर देण्यात येणार आहे. केवळ माणसंच नाही तर प्राणी, वनस्पती आणि आपल्या पृथ्वीच्या आरोग्याचेही रक्षण करत, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्याला विज्ञानाचा आधार असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे.

आज माहिती क्षणात पसरते पण त्यातली सगळी माहिती खरीच असेल असं नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्स, घरगुती उपायांचे दावे किंवा ऐकीव गोष्टी यामुळे अनेकजण गोंधळून जातात. काही माहिती तर चुकीची आणि अवैज्ञानिकही असते त्यामुळे मुलांसह ज्येष्ठांच्या आरोग्यावरही गंभीर परिणामही होऊ शकतात. ही चुकीची माहिती फक्त संभ्रम निर्माण करत नाही, तर डॉक्टर आणि आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वासही कमी करते. आपण कोरोनासारख्या आरोग्य आणीबाणीत पाहिलंच आहे की अफवा किती वेगानं पसरतात. वाट्टेल ते उपाय कसे केले जातात. योग्य उपचारांपासून त्यामुळे अनेकजण लांब राहतात. त्यामुळे जीवनशैली, आजार, उपचार यात वैज्ञानिक माहिती, आरोग्यविषय योग्य शास्त्रीय दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचा सल्ला, माहितीची पडताळणी हे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण, आहार, मानसिक आरोग्य किंवा शारीरिक आजारांपासून बचाव या साऱ्यासाठी योग्य माहिती, तज्ज्ञ सल्लाच गरजेचा आहे. फुकट माहिती आहे म्हणून फॅक्ट चेक न केलेल्या गोष्टी आपण स्वत:वर प्रयोग म्हणून करण्यात काहीच अर्थ नाही. तो जीवाशी खेळ होऊ शकतो.

काय करायला हवं?

फॉरवर्डवर विश्वास कमी ठेवा, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय, अचाट दावे यांच्यावर भरवसा ठेवून औषधं बंद न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्या. एआयला विचारून स्वत:च स्वत:वर उपचार करू नका. लक्षणं शोधून आपल्याला गंभीर आजार झाला आहे असं समजून खचून जाऊ नका. अवैज्ञानिक, असत्य माहितीची ढकलगाडी चालवून चुकीची माहिती पसरवू नका. आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य, जीवनशैली यांची काळजी घ्या, पण शास्त्रीय माहितीचा हात सोडू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : World Health Day 2026: Avoid Viral Treatments, Trust Science

Web Summary : Beware of unverified online health advice. This World Health Day emphasizes science-backed healthcare for all, including animals and the planet. Rely on expert advice and verified information for health decisions, avoiding potentially harmful self-treatments. Consult doctors, not just the internet, for well-being.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यसोशल व्हायरलसोशल मीडियाजागतिक आरोग्य संघटना