Join us

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड 'चिंच'; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST

आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे.

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. पण आयुर्वेद तज्ञ म्हणतात की, आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे स्थित शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राचे प्रमुख डॉ अमित कुमार यांच्या मते चिंचेमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म असतात. हिवाळ्यात कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्याने नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका असतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. पण चिंचेच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करता येतं.

इम्युनिटी मजबूत

डॉ. अमित सांगतात की चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. त्यामुळे शरीरातील सेल्स सुरक्षित राहतात, तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो.

हृदयाची घ्या काळजी 

चिंचेमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून नसा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. याशिवाय चिंचेमुळे जळजळ कमी होते, जी शरीराची इम्युनिटी सुधारण्यासाठी आवश्यक असते.

पचनक्रिया सुधारते

पचनसंस्थेसाठीही चिंच फायदेशीर आहे. चिंचेच्या सेवनाने बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत 

चिंचेमध्ये भरपूर फायबर असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले अमीनो ॲसिड शरीराचे टिश्यू मजबूत करण्याचं काम करतात.

चिंचेचा असा करा वापर

चिंचेचा वापर चटणी किंवा सूपमध्ये करता येतो. तुम्हाला हवी असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही अशीही खाऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की, त्याचं जास्त प्रमाणात सेवन करणं महागात पडू शकतं.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य