Join us

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी कसं ओळखाल? पाहा दोन्हीतील फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:32 IST

Heart Attack vs  Acidity Symptoms : अनेकदा छातीत अचानक दुखू लागतं. पण विचार केला जातो की, अ‍ॅसिडिटीमुळे असं होत असेल. पण मुळात हे हार्ट अ‍ॅटॅकचं सुद्धा लक्षण असू शकतं. 

Heart Attack vs  Acidity Symptoms : हार्ट अ‍ॅटॅक त्याची कारणं, लक्षणं, उपाय यांबाबत सतत सगळीकडे चर्चा सुरू असते. वेगवेगळे सल्ले दिले जातात. धोका टाळण्यासाठी काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. कारण काय तर केवळ भारतातच नाही तर जगभरात हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि यामुळे शेकडो लोकांचा जीव जात आहे. पण इतकी जागरूकता केली जात असूनही बऱ्याच लोकांना याच्या लक्षणांबाबत पुरेशी माहिती नसते. ही लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा छातीत अचानक दुखू लागतं. पण विचार केला जातो की, अ‍ॅसिडिटीमुळे असं होत असेल. पण मुळात हे हार्ट अ‍ॅटॅकचं (How to Identify Heart Attack at Home)  सुद्धा लक्षण असू शकतं. 

न्यूट्रिशन अ‍ॅन्ड डाएट एक्सपर्ट सोनिया नारंग यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, छातीत दुखण्याची काही लक्षणं समजून घेऊन हे दुखणं हार्ट अ‍ॅटॅकचं आहे की केवळ अ‍ॅसिडिटी हे माहीत केलं जाऊ शकतं. 

WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरात दरवर्षी साधारण ६.८ कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव जातो. यातील सगळ्यात जास्त जीव हार्ट डिजीज, स्ट्रोस आणि श्वासासंबंधी आजारांमुळे जातात. भारतात दरवर्षी लाखो लोकांना हार्ट अ‍ॅटॅक येतात. जर सुरूवातीची लक्षण आधीच माहीत असली तर धोका टाळता येतो. 

छातीत वेदना होण्याची कारणं अनेक असू शकतात. ज्यात हार्ट अ‍ॅटॅक, अ‍ॅसिडिटी, गॅस, मसल्स स्ट्रेन आणि स्ट्रेस यांचा समावेश आहे. पण जर हे दुखणं नेहमी नेहमी होत असेल किंवा त्यासोबत इतरही काही लक्षणं दिसत असेल तर याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

हार्ट अ‍ॅटॅक आणि अ‍ॅसिडिटीमध्ये फरक

वेदना कुठे जात आहे

सोनिया नारंग सांगतात की, जर दुखणं गळ्यापर्यंत होत असेल तर हे सामान्यपणे अ‍ॅसिडिटीचं लक्षण आहे. पण जर दुखणं खांदे, जबडा किंवा डाव्या हातापर्यंत पसरत असेल तर हा हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत असू शकतो.

कसं दुखतंय?

जर छातीत जळजळ होत असेल तर ही अ‍ॅसिडिटी आहे. पण जर छातीत जडपणा वाटत असेल, दबाव जाणवत असेल तर हा हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत असू शकतो. 

झोपल्यावर वेदना वाढतात की नाही

सोनिया सांगतात की, जर लेटल्यावर वेदना वाढत असेल तर ही अ‍ॅसिडिटी आहे. पण जर लेटल्यावर काहीच बदल होत नसेल म्हणजे दुखणं तसंच कायम असेल तर हा हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत असू शकतो.

तोंडाची चव

जर तोंडाची चव कडवट वाटत असेल, ढेकर येत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल तर हे अ‍ॅसिडिटीचं लक्षण आहे. पण जर घाम येत असेल, चक्कर येत असेल किंवा दम लागत असेल तर हार्ट अ‍ॅटॅक असू शकतो.

अ‍ॅसिडिटीवर उपाय

- अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून प्या. 

- चिमुटभर ओवा आणि काळं मीठ चावून खा.

- जेवण केल्यावर लगेच लेटू नका.

- चहा, कॉफी आणि तळलेल्या पदार्थांपासून दूर रहा.

- स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन करा.

टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगआरोग्यहेल्थ टिप्स