Join us

चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:49 IST

हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि ब्लॉकेजेससारखे हृदयाशी संबंधित आजार भारतात सर्वात मोठं आरोग्य आव्हान बनलं आहे.

जगभरात हृदयरोगाच्या समस्यांचं वाढतं प्रमाण आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचं कारण आहे. आपण सर्वांनी हृदयरोगाबाबत सतर्क राहणं अत्यंत अत्यावश्यक आहे. आकडेवारीवरून असं दिसून येतं की, हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि ब्लॉकेजेससारखे हृदयाशी संबंधित आजार भारतात सर्वात मोठं आरोग्य आव्हान बनलं आहे. चारपैकी एक मृत्यू हृदयाशी संबंधित समस्येमुळे होतो. आता ३०-४० वयोगटातील तरुणांमध्येही  हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. ताणतणाव, चुकीचा आहार, जास्त मीठ, तेल आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही याची कारणं मानली जातात.

हृदयरोगाच्या वाढत्या जोखमीबद्दल संशोधकांना अलिकडच्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, लहान मुलं देखील हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त आहेत. सर्व पालकांनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मुलांमधील ब्लड प्रेशर येत्या काही दशकांमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका वाढवू शकतो. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन (JAMA) मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, ज्या मुलांना वयाच्या सातव्या वर्षी हाय ब्लड प्रेशर होतं त्यांना वयाच्या ५० व्या वर्षी  हार्ट अटॅक आणि  हार्ट फेल्युअरने मृत्यू होण्याचा धोका जास्त असू शकतो. 

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहाय्यक प्राध्यापक आणि रिसर्चच्या प्रमुख लेखिका एलेक्सा फ्रीडमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानपणी हाय ब्लड प्रेशर असल्यास पुढील काही वर्षांमध्ये मृत्यूचा धोका ४० ते ५० टक्क्यांनी वाढतो. या रिसर्चसाठी, १९५९ ते १९६६ दरम्यान जन्मलेल्या सुमारे ३८,००० मुलांच्या आरोग्याचं पुढील सहा दशके (६० वर्षे) निरीक्षण करण्यात आलं. जवळजवळ ५० वर्षांनंतर २०१६ पर्यंत, एकूण २,८३७ सहभागींचा मृत्यू झाला होता, त्यापैकी ५०४ मृत्यू हृदयरोगामुळे झाले होते.

संशोधकांनी सांगितलं की, १९५९ ते १९६६ दरम्यान जन्मलेल्या अमेरिकन मुलांमध्ये सात वर्षांच्या वयात हाय ब्लड प्रेशर हा अकाली (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी) मृत्युच्या वाढीव जोखमीशी संबंधित होता. निकालांवरून असं दिसून येतं की, पालकांनी लहानपणीच नियमितपणे आपल्या मुलाच्या ब्लड प्रेशरचं निरीक्षण करावं आणि लहानपणापासूनच हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो.

तज्ज्ञांचे दिलेल्या माहितीनुसार, लोकांना असं वाटतं की, हाय ब्लड प्रेशर हा फक्त प्रौढांसाठीच असतो, परंतु रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, भारतातील सुमारे ७-१०% मुलांना हाय ब्लड प्रेशरचा धोका असतो. शहरात राहणाऱ्या मुलांमध्ये, लठ्ठपणा असलेल्यांमध्ये आणि मोबाईल फोन किंवा टीव्ही जास्त पाहणाऱ्यांमध्ये ही समस्या आणखी गंभीर असू शकते. मुलांना जंक फूड, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड स्नॅक्स, नूडल्स आणि चिप्स देऊ नका. या सर्व गोष्टींमुळे हाय ब्लड प्रेशर आणि भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाआरोग्यहृदयरोग