Join us

तुमच्या उशीच्या कव्हरवर टॉयलेट सीटपेक्षा १७००० पट जास्त बॅक्टेरिया? 'ही' आहे धुण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:08 IST

कामाच्या नादात बऱ्याच महिलांना वेळेवर चादर किंवा उशीचं कव्हर बदलण्याचं लक्षात राहत नाही.

कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी आणि जंतूंपासून दूर राहण्यासाठी, महिला स्वयंपाक केल्यानंतर स्वच्छता करतात. फरशी व्यवस्थित पुसणं, धूळ साफ करणं, शौचालय स्वच्छ करणं ही कामं करण्यात त्याचा संपूर्ण दिवस जातो. याच कामाच्या नादात बऱ्याच महिलांना वेळेवर चादर किंवा उशीचं कव्हर बदलण्याचं लक्षात राहत नाही.

जोपर्यंत उशीचं कव्हर जास्त घाणेरडं दिसत नाहीत तोपर्यंत महिला ते बदलत नाहीत. हिच एक मोठी चूक ठरत आहे. रिसर्चमधून आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. त्यांचा असा दावा आहे की, ४ आठवडे न धुतलेल्या उशीच्या कव्हरमध्ये टॉयलेट सीटपेक्षा १७ हजार पट जास्त बॅक्टेरिया असतात. अशा परिस्थितीत, उशीचं कव्हर कधी बदलायचं आणि धुवायचं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

नॅशनल स्लीप फाउंडेशन या अमेरिकन एनजीओच्या रिपोर्टनुसार, फक्त एका आठवड्यानंतर न धुतलेल्या उशाच्या कव्हरमध्ये प्रति चौरस इंचात सुमारे ३ मिलियन बॅक्टेरिया आढळून आले. जे सरासरी टॉयलेट सीटपेक्षा सुमारे १७,००० पट जास्त बॅक्टेरिया आहेत. म्हणूनच उशांच्या कव्हर व्यतिरिक्त चादर देखील दर काही दिवसांनी धुवावी.

धुण्याची योग्य पद्धत

चादर आणि उशीचं कव्हर धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी जितके गरम पाणी वापरता तितके बॅक्टेरिया आणि जंतू लवकर मरतात. खूप डिटर्जंट वापरू नका. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. याशिवाय धुतल्यानंतर ते इस्त्री करायला विसरू नका.

उशीचं कव्हर आणि चादर कधी बदलावी?

- आठवड्यातून किमान एकदा तरी उशीचं कव्हर आणि चादर बदलायला हवी,  धुवायला हवी.

- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर दर तीन-चार दिवसांनी कव्हर आणि चादर धुवा.

- उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे दुर्गंधी देखील येते म्हणून तुमचं कव्हर वारंवार बदला.

अशी ठेवा स्वच्छता

- झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल. उशीच कव्हर आणि चादर खराब होणार नाहीत.

- जिममधून आल्यानंतर बेडवर झोपण्याची किंवा बसण्याची चूक करू नका.

- झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाका.

- बेडवर खाणे-पिणे टाळा आणि पाळीव प्राण्यांना बेडजवळ येऊ देऊ नका.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य