प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. काही जणांना कोरा चहा, काहींना दुधाचा चहा तर काहींना मसाला चहा आवडतो. पण चहा बनवताना लोक अनेकदा चूक करतात, ज्यामुळे चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतो. न्यूट्रीशनिस्ट लिमा महाजन यांनी एका व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांच्या एका चुकीमुळे चहा विषात कसा बदलतो हे सांगितलं आहे. लिमा यांनी चहा बनवण्याची योग्य पद्धत देखील सांगितली आहे.
न्यूट्रीशनिस्ट लिमा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ज्या पद्धतीने चहा बनवत आहात त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनावर, उर्जेच्या पातळीवर आणि पोषक तत्वांच्या शोषणावर होतो. बहुतेक लोक चहा जास्त उकळण्याची किंवा वारंवार उकळण्याची चूक करतात. चहा वारंवार उकळल्याने जास्त टॅनिन बाहेर पडतं. टॅनिनचे आरोग्यासाठी फायदे आहेत, परंतु जास्त प्रमाणात टॅनिन तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. यामुळे गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच जास्त टॅनिन दातांच्या आरोग्यासाठी, लिव्हरच्या आरोग्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि किडनीच्या आरोग्यासाठी देखील चांगलं नाही.
चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
चहा हे एक आरोग्यदायी पेय असू शकतं, जर ते योग्य पद्धतीने बनवलं गेलं तर. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात उकळण्यासाठी पाणी ठेवा. त्यात बडीशेप, दालचिनी आणि लवंगा यासारख्या काही औषधी वनस्पती घाला आणि सुमारे ३ ते ४ मिनिटे उकळवा. आता एका कपमध्ये चहा पावडर घाला. त्यावर हे मसाल्यांचं गरम पाणी टाका. एक मिनिट ते झाकून ठेवा. यानंतर तुम्हाला दूध वेगळं उकळावं लागेल आणि तुमच्या आवडीनुसार या चहामध्ये घालावं लागेल. आता चहा थोडा वेळ झाकून ठेवावा जेणेकरून चव चांगली होईल. त्यानंतर गाळून घ्या आणि चहाचा आनंद घ्या.
अनेकांना चहा पुन्हा पुन्हा गरम करण्याची सवय असते. ही सवय तुमच्या चहाला विष बनवत आहे. यामुळे चहातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि त्याचा लिव्हरवरही अत्यंत वाईट परिणाम होतो. म्हणूनएका वेळी जितका चहा प्यायचा असेल तितकाच चहा बनवा. चहा गरम असतानाच प्या. सतत चहा गरम करू नका.