Join us   

लग्नाच्या मौसमात पोटावर अत्याचार? 3 पदार्थ घरी थोडेसेच खाऊन लग्नाला जा; करा एन्जॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:45 PM

लग्नाची धामधूम एन्जॉय करायची असेल तर आपली तब्येत जपायला हवी, पोटाच्या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी सोपे उपाय...

ठळक मुद्दे लग्नसराईदरम्यान कोणते पदार्थ आवर्जून खाल- आहारतज्ज्ञ सांगतातघरच्या किंवा मित्र-मैत्रीणींच्या लग्नात धमाल करायची असेल तर पोटाची काळजी घ्यायलाच हवी...

सणवार संपले आणि आता सुरु झाली लग्नसराई. कुटुंबातील, जवळच्या मित्र-मैत्रीणीचे किंवा अगदी शेजाऱ्यांच्या घरात लग्न असेल तर ते आपण मस्त एन्जॉय करु शकलो पाहीजे. लग्नघरी असणारे काम, आपली तयारी यासाठी आपली तब्येत ठणठणीत असणे आवश्यक आहे ना. लग्नाच्या काळात खरेदीसाठी होणारी धावपळ, पाहुण्यांमुळे आणि मज्जा करण्यासाठी होणारी जागरणं आणि त्यातच वेळी-अवेळी काहीबाही खाल्ल्यामुळे उद्भवणाऱ्या पोटाच्या तक्रारी. हे सगळे टाळण्यासाठी तुम्ही स्वत:ची थोडी काळजी घेतली तर आपल्या जवळच्या व्यक्तीचे लग्न तुम्ही नक्की एन्जॉय करु शकाल. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर लग्नाच्या कालावधीत आवर्जून खायला पाहिजेत असे तीन पदार्थ सांगतात. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही. मुख्य म्हणजे लग्नाच्या आधी असणारे संगीत, मेहेंदी, हळद आणि मुख्य लग्न हे सगळे कार्यक्रम तुम्ही अगदी मस्त पद्धतीने एन्जॉय करु शकाल आणि या दरम्यानच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वादही घेऊ शकाल. 

(Image : Google)

१. मेथी लाडू - गूळ, तूप आणि सुंठ यांचा वापर करुन केलेले मेथीचे लाडू आताच्या हवामानासाठी सगळ्यात चांगले. पोटदुखी, बद्धकोष्ठता या समस्यांपासून दूर राहण्यासाठी हे लाडू खाणे अतिशय उपयुक्त ठरु शकते. आतड्यांचे काम सुरळीत व्हावेत यासाठी मेथीच्या लाडूत असणारे घटक उपयुक्त ठरतात. तसेच तुमचे केस चमकदार दिसण्यासाठीही या लाडूंचा उपयोग होतो. एरवी पोट ठिक नसल्याने आपले केस खूप कोरडे किंवा रुक्ष दिसतात. मात्र मेथ्या केसांच्या आरोग्यासाठीही अतिशय उत्तम काम करत असल्याने तुमच्या सौंदर्यातही भर पडायला मदत होते. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला किंवा संध्याकाळी ४ ते ६ या वेळात हा लाडू खाल्लेला चांगला. तसेच तुमच्या झोपेच्या वेळा बदलल्या असतील, व्यायामात खंड पडला असेल तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमित ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

२. ताक - दुपारच्या जेवणानंतर ग्लासभर ताक आवर्जून प्या. या ताकात हिंग आणि काळे मीठ घालायला विसरु नका. ताकात प्रोबायोटिक्स आणि व्हीटॅमिन १२ भरपूर प्रमाणात असते. हिंग आणि काळ्या मीठामुळे गॅसेस, सूज यांसारखे त्रास दूर होण्यास मदत होते. त्यामुळे लग्नघरी तुम्ही रात्रीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असाल तर दुपारच्या वेळी घरी हा उपाय करायला अजिबात विसरु नका. त्यामुळे तुम्ही लग्नाचे सगळे कार्यक्रम पचनाचा किंवा पोटाचा कोणताही त्रास न होता एन्जॉय करु शकाल. 

३. च्यवनप्राश - झोपताना न चुकता च्यवनप्राश खा. यासोबत कपभर दूधही घ्या. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. लग्नसराईत त्वचा चमकदार राहण्यासाठीही याची मदत होईल. च्यवनप्राश हा फ्लेव्होनॉइडस आणि अँटीऑक्सिडंटस यांचा उत्तम स्रोत असतो, त्यामुळे शरीराला त्याचा निश्चित फायदा होईल. लग्नाच्या काळात अनेक कार्यक्रम हे रात्रीच असतात. तसेच इतरही अनेक कारणांनी आपले जागरण होते. सध्या डेस्टीनेशन वेडींगचेही फॅड आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही हा उपाय केलात तर तुमची दमणूक होऊनही तब्येत ठणठणीत राहायला मदत होईल.      

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलग्नआहार योजना