घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे, किंवा संसर्गामुळे होते. (Sore throat, constant throat infection? 5 remedies, you won't have to stay in bed, home remedies )अशा वेळी घसा जळजळतो. खवखवतो आणि बोलताना किंवा खाता-पिताना प्रचंड वेदना होतात. सुरुवातीला ही समस्या सामान्य वाटते, पण दुर्लक्ष केल्यास ती वाढू शकते आणि औषधांची गरज लागू शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य घरगुती उपाय करायचे. त्यामुळे त्रास कमी होतो आणि आराम मिळतो. तसेच पुढे दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत.
घसा दुखत असेल, सोलवटलेला वाटत असेल तर सर्वात आधी गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा उपाय आपण सारेच करतो. एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या केल्याने घशाची सूज कमी होते. तेथील जंतू नष्ट होतात. हळद आणि दूध हे त्रासावर रामबाण औषध मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून ते दूध प्यायचे. हळदीतील अँण्टीसेप्टिक गुणधर्म घशातली जळजळ शांत करतात आणि झोपही लागते.
तुळस आणि आल्याचा काढा तयार करून प्यायल्यास घशाला खूप आराम मिळतो. या काढ्यासाठी पाण्यात तुळशीची पाने, आल्याचा तुकडा, थोडी काळीमिरी आणि गवती चहा घालून उकळायचे. हा काढा दिवसातून एक किंवा दोन वेळा घेतल्यास घशाची सूज कमी होते. आल्याचा रस आणि मध यांचं मिश्रण घेतल्यासही घसा मोकळा होतो. एक चमचा मधात थोडा आल्याचा रस घालून ते थोडं थोडं करून चाटा. त्यामुळे घशाचा कोरडेपणा राहत नाही आणि सततचा त्रास कमी होतो.
वाफ घेणे हाही एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात थोडं मिंट ऑईल किंवा ओवा टाकून घेतलेली वाफ घशातील बंद जागा मोकळ्या करते. वाफ घेतल्याने सर्दी, खवखव दूर होण्यास मदत होते. खूप थंड पदार्थ, बर्फाचे पाणी किंवा आइसक्रीम टाळाणे महत्वाचे आहे. तसेच उष्ण गरमागरम आहार घ्यावा. गरम सूप, मूगडाळीचे वरण, खिचडी असे पदार्थ खायचे. घशाला आराम मिळतो आणि पचनासाठीही ते सोपे असतात.
घसा दुखणं सामान्य असलं तरी काही वेळा ही लक्षणे तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास किंवा ताप, अन्न-पाणी घेता न येणं, सततचा त्रास जाणवायला लागल्यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. पण घरच्या घरी केलेले हे साधे उपाय नियमितपणे केले तर त्रास लवकर कमी होतो आणि पुन्हा त्रास होण्याची शक्यता कमी असते.