Join us

अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:52 IST

जुनी चप्पल घालणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे पायांना हानी पोहोचवू शकते.

आपण बऱ्याचदा आपले बूट आणि चप्पल पूर्णपणे तुटेपर्यंत वापरत राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, खूप जुनी चप्पल घालणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे पायांना हानी पोहोचवू शकते. तसेच त्याचा परिणाम तुमचा गुडघा, कंबर आणि मणक्यावरही दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, ठराविक वेळेनंतर चप्पल बदलणं खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा दीर्घकाळ जुनीच चप्पल घालण्याची ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर चप्पल सतत वापरली जात असेल तर ती ६-७ महिन्यांत बदलली पाहिजे. जर चप्पलचा सोल खूप घासला गेला असेल किंवा शेप खराब झाला असेल, तर चप्पल बदलण्याची वेळ आली आहे. जुनी चप्पल घालल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे पाय दुखणं, पाठदुखी, टाचा दुखणं अशा तक्रारी उद्भवू शकतात.

काही चप्पल पायांना योग्यरित्या आधार देत नाहीत, यामुळे प्लांटार फॅसिटायटिस नावाची समस्या देखील उद्भवू शकते, ज्यामध्ये टाचेखाली तीव्र वेदना होतात. यासोबतच जुनी चप्पल बॅक्टेरिया आणि फंगसचं घर बनतात. पावसाळ्यात पाणी, घाण आणि ओलावा यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका, चप्पलमुळे त्वचेवर पुरळ येण्याचा धोका देखील अनेक पटीने वाढतो. जर तुमच्या चप्पलला दुर्गंधी येत असेल किंवा पृष्ठभाग फाटलेला असेल तर ती चप्पल ताबडतोब बदला.

जर तुमच्या घरात लहान मुलं आणि वृद्ध असतील तर त्यांच्या चप्पलकडे विशेष लक्ष द्या. कारण मुलं आणि वृद्धांची हाडं आणि स्नायू अधिक संवेदनशील असतात. त्यांना चांगली पकड आणि कुशनिंग असलेल्या चप्पलची आवश्यकता असते. तसेच वृद्धांसाठी चप्पलची योग्य निवड महत्त्वाची आहे जेणेकरून चालताना त्यांना कोणचाही त्रास होणार नाही.

योग्य चप्पल म्हणजे जी घातल्यानंतर पायांना आराम देते, जर चप्पल घातल्यानंतर पायांना आराम मिळत नसेल तर चप्पल बदलण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या. नेहमी खात्री करा की चप्पलचे मटेरियल चांगले आहे जेणेकरून कमी ओलावा आणि घाण जमा होईल आणि ते स्वच्छ करणं सोपं होईल. जर तुम्ही तुमच्या पायांच्या आरोग्याची गंभीरपणे काळजी घेत असाल तर तुम्ही वेळोवेळी तुमची चप्पल बदलली पाहिजे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स