Join us

तासंतास ढाराढूर झोपत असाल तर वाढतो जीव जाण्याचा धोका! ९ तास झोप म्हणजे जीवाला घोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:51 IST

Sleep Connection With Health: रोज जर पुरेशी झोप घेत नसाल तर आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

Sleep Connection With Health: आपण जर पाहिलं तर वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट्स, डॉक्टर्स निरोगी राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. एक्सपर्टनुसार प्रत्येक व्यक्तीने रोज रात्री सामान्यपणे ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. इतकी झोप तब्येत चांगली ठेवण्यासाठी पुरेशी मानली जाते. पण जर यापेक्षा जास्त म्हणजे नेहमीच आपण ९ तासांची झोप घेत असाल तर सावध होण्याची गरज आहे. कारण एका रिसर्चनुसार, ८ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर वेगवेगळ्या समस्या होऊन जीव जाण्याचा धोका अधिक वाढतो.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार झोपेचा हरवलेला ताळमेळ, कधी जास्त झोपणं कधी कमी यामुळेही शरीराला नुकसान होते. हृदयाच्या कामावर परिणाम हाेतो, ताण वाढतो. तर आता स्लीप हेल्थ फांऊडेशननं प्रसिध्द केलेला एक अभ्यास सांगतोय की कमी झोपलं तर १४ टक्के हृदयविकाराचा धोका वाढतो पण नऊ तासांहूनही जास्त झोपत असाल तर मात्र ३४ टक्के धोका वाढतो. त्यामुळे मापात झोप, नियमित वेळेवर झोपणं आणि तेव्हाच उठणं फार आवश्यक आहे.

झोप आणि आरोग्याचा संबंध

आपल्या झोपेचा आणि आरोग्याचा संबंध थेट असतो. कमी झोपले तरी समस्या आणि जास्त झोपले तरी समस्या होऊ शकते. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, देशात ५८ टक्के लोक रात्री ११ वाजतानंतर झोपतात. ८८ टक्के लोक रात्री अनेकदा उठतात. देशात प्रत्येक चारपैकी एका व्यक्तीला झोप न येण्याची समस्या आहे. केवळ ३५ टक्के ८ तासांची पूर्ण झोप घेऊ शकतात.

झोप न घेण्याचा शरीरावर प्रभाव

जर आपण १८ तास झोपल्याशिवाय राहत असाल तर यामुळे ब्लड प्रेशर हाय होण्याचा आणि हृदयावर दबाव पडण्याचा धोका वाढतो. जे लोक झोपेशिवाय २४ तास राहतात, त्यांच्यात चिडचिडपणा वाढतो आणि कामात लक्ष लागत नाहीत. ३६ तास जर झोपेशिवाय राहत असाल तर एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. 

झोप न घेतल्यानं होणारे आजार

झोप पूर्ण झाली नाही तर शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. ज्यात डायबिटीस, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, हार्मोन्समध्ये असंतुलन, डीएनए डॅमेज, कॅन्सर या आजारांचा समावेश होते. इतकंच नाही तर व्यक्ती मानसिक आजारी होऊन डिप्रेशनमध्येही जाऊ शकते.

झोप शरीरासाठी खूप महत्वाची असते. कारण झोपेदरम्यान आपलं शरीर रिपेअर होत असतं. पुरेशी आणि चांगली झोप घेतली नाही तर शरीराची डिफेन्स सिस्टीम कमजोर होऊ लागते. खराब झोपेमुळे इम्यूनिटीवर वाईट प्रभाव पडतो. कमी झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक वेगवेगळ्या समस्या होतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स