Kidney Damage Sign on Skin : चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यानं किडनीचं भरपूर नुकसान होतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर किडनी डॅमेज होऊ शकतात. जर किडनी डॅमेज होत असतील तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. शरीरात यासंबंधी काही लक्षणं दिसू लागतात. त्वचेवरही काही लक्षणं दिसतात. जर या लक्षणांकडे सामान्य समजून दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. अशाच काही लक्षणांबाबत आज आपण पाहणार आहोत.
ड्राय स्किन
किडनीमध्ये जर काही बिघाड झाला तर शरीरातील विषारी तत्व बाहेर पडत नाही, ज्यामुळे त्वचेवर खाज येते. त्वचा ड्राय होते. याला यूरेमिक प्रुरिटस म्हटलं जातं. खाज इतकी जास्त येते की, रात्रीची झोपही येत नाही.
त्वचेचा रंग बदलणे
किडनीसंबंधी काही आजार झाला असेल तर त्वचेचा रंग पिवळा किंवा भुरका दिसू लागतो. काही केसेसमध्ये त्वचेवर काळे किंवा पांढरे डाग दिसू लागतात. जे शरीरात जमा झालेल्या टॉक्सिनमुळे दिसतात.
सूज
किडनी जर डॅमेज झाल्या तर शरीरात सोडिअम आणि पाणी जमा होऊ लागतं. ज्यामुळे पाय, हात आणि चेहऱ्यावर सूज येते. याला एडिमा म्हणतात.
रॅशेज
किडनी फेलिअरमुळे शरीरात यूरिक अॅसिड आणि इतरही अनेक विषारी तत्व वाढता. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज येतात. सोबतच खाजही येते.
पुरळ किंवा फोड
काही गंभीर केसेसमध्ये त्वचेवर पुरळ किंवा फोड येतात. ज्यात पाणी भरलेलं असतं. ही समस्या कॅल्सीफिलॅक्सिस कंडीशनमुळे होते, जी किडनी फेलिअर रूग्णांमध्ये बघितली जाते.
त्वचा टाइट होणे
किडनी डिजीजमुळे त्वचेमधील लवचिकता कमी होते आणि त्वचा इतकी टाइट होते की, चिमटीतही पकडता येत नाही. ही समस्या शरीरात पाणी आणि मिनरल्सच्या असंतुलनामुळे होते.
स्किनखाली कॅल्शिअम जमा होणे
जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाहीत, तेव्हा शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फेटची लेव्हल बिघडते. ज्यामुळे त्वचेच्या खाली पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे हार्ड डिपॉझिट बनतात. ज्यांना कॅल्सीफिकेशन म्हटलं जातं.