शीतल मोगल (आहारतज्ज्ञ)
आजचा काळ आधुनिक तंत्रज्ञान प्रधान. मात्र, त्यासोबतच झटपट जीवनशैलीकडे अनेकांचा कल दिसतो. या बदललेल्या जीवनशैलीत आहारांच्या सवयींमध्येही मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. पूर्वी घरात लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत, लस्सी, दूध किंवा विविध फळांचे रस शीतपेय म्हणून ऋतूंप्रमाणे आहारात असत. पण आता ती जागा कोल्ड्रिंक्सने घेतली आहे. आकर्षक जाहिराती, सेलिब्रिटींचे प्रमोशन आणि रंगीत व आकर्षक बाटल्या यामुळे तरुण मुलं कोल्ड्रिंक मोठ्या प्रमाणात पितात. हल्ली तर एनर्जी ड्रिंक म्हणूनही अनेक बाटलीबंद पेय पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तोच मोठा गंभीर प्रश्न होतो आहे.
शाळा, कॉलेज, सिनेमागृह, पार्टी... कुठेही कोल्ड्रिंक्स अनिवार्य झालेले दिसतात. पाणी पिण्याऐवजी मुलं कोल्ड्रिंक्स पसंत करतात. अगदी शाळांमध्ये मुलांना एनर्जी येण्यासाठी पालक काही एनर्जी ड्रिंक्स डब्यासोबत देतात. व्यायाम करताना किंवा जिम करताना काही ड्रिंक्स वापरले जातात. परंतु, या सवयींमुळे मुलांचे आरोग्य हळूहळू ढासळत चालले आहे, हे अनेकांना समजत नाही.
‘कूल’ ‘एनर्जेटिक’ ‘फ्रेश’ अशा आकर्षक शब्दात प्रसिद्ध खेळाडू आणि कलाकार या डिंक्सच्या जाहिराती करतात. तरुणांच्या मनावर प्रभाव टाकतात. पण हे पाणी म्हणजे केवळ साखर आणि रसायनांचे मिश्रण असते. यात कुठल्याही प्रकारची प्रथिनं किंवा जीवनसत्वं नसतात. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि भूक मंदावते.
कोल्ड्रिंक्समध्ये साखर, आम्ल, कॅफिन, कृत्रिम रंग, कृत्रिम चव, फॉस्फोटिक आम्ल किंवा सायट्रिक आम्ल हे प्रामुख्याने असतात.
हे कोल्ड्रिंक्स नव्हे तर कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात. ते पिणं म्हणजे पैसे देऊन कार्बन डायऑक्साईड विकत घेणंच आहे.
त्यामधील सर्व रसायनांमुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया मारले जाऊन वाईट बॅक्टेरियांना पोषण मिळते. परिणामी, वाईट बॅक्टेरियांची वाढ होते. त्याचा परिणाम पोटातील नाजूक आतडे आणि पचन संस्थेवर होतो. खाल्लेले अन्न अंगी लागत नाही. त्यामुळे एक तर मुलं खूप लठ्ठ किंवा खूप बारीक होतात.
कोल्ड्रिंक्समध्ये रसायने तर असतातच, परंतु ते ज्या प्लास्टिक बाटलीमध्ये असतात त्याही खूप घातक असतात.
मॅन्युफॅक्चरिंग झाल्यापासून बाटल्या थंड ठिकाणी ठेवतात. परंतु, ने-आण करताना त्या ट्रक किंवा कंटेनरमध्ये उन्हात येतात. मॉलमध्ये किंवा दुकानांमध्ये त्या बाहेर महिनोन् महिने उन्हात असतात. उन्हामुळे प्लास्टिक वितळून ते पेयांमध्ये उतरते, शरीरात जाते. उष्णतेमुळे BPA (Bisphenol A) हे प्लास्टिक पेयात मिसळते. हे एक हार्मोन बिघडवणारे रसायन आहे. तसेच प्लास्टिक लवचिक ठेवण्यासाठी DEHP (Diethylexyl Phthalate) हे रसायन वापरले जाते. उष्णतेमुळे हे पण पेयात उतरते.
आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे हार्मोन्स बिघडतात. तसेच पचनसंस्थेवर परिणाम होऊन डायबिटीस, स्थुलता, थायरॉइड आणि अगदी कॅन्सरही होण्याची दाट शक्यता असते.
तसेच लिव्हर, किडनीचे त्रास. तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. याचबरोबर तरुण मुलांमध्ये शुक्राणूंची कमतरता (sperm counts) कमी होण्याचा परिणामही वाढू लागला आहे. त्यामुळे भविष्यात मूल होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. गल्लोगल्ली, IVF centre आपण पाहतोच आहोत. कोल्ड्रिंक्स अति प्यायल्याने वंध्यत्व येण्याची शक्यताही वाढते. कारण तरुण मुलींमध्ये हार्मोनल इन बॅलन्स होऊन पाळी अनियमित होते. पीसीओडी व पीसीओएस या समस्या वाढतात. त्यामुळे मुलींमधील प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. तसेच या पिढीमध्ये थकवा, त्वचाविकार व चिडचिड हे त्रासही वाढलेले दिसतात.
...तर करायचे काय?
१. कोल्ड्रिंक्स बाजारात असतीलच. पण आपल्या हातात आहे आपली जीवनशैली बदलणे.
२. प्लास्टिकचा वापर, कोल्ड्रिंक्स पिणं बंद करा. पाणी घरून स्टीलच्या बाटलीत न्या.
३. एनर्जी ड्रिंक म्हणून वाट्टेल ते पिणं टाळा.
४. घरची भाजी-पोळी, पराठा, थालीपीठ, फळं, फुटाणे, मुरमुरे, भडंग किंवा सॅलेड अगदी गुळ-तूप पोळीचा लाडू, राजगिरा लाडू असे पदार्थ डब्यामध्ये घेऊनच बाहेर पडा.
५. चांगली एनर्जी व जीवनसत्वे यातून मिळतीलच. हॉटेलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये खाणे व पिणे टाळा.
६. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज ४५ मिनिटे तरी नियमाने व्यायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढवा.
कुठली पेयं उत्तम?
आपल्या घरगुती पेयांची परंपरा आरोग्यदायी आहे. ती शरीराला पोषण देतात. अगदी सरबतं, कांजी, ताक, मठ्ठा हे सारं पारंपरिक उत्तमच आहे.
बाटलीबंद पेय एनर्जीच्या नावाखाली पिणं कुल अजिबात नाही, हे आपल्याला वेळीच कळलेलं बरं...
