Health : सर्दी-पडसा होणं फारच कॉमन समस्या आहेत. वातावरणात थोडा जरी बदल झाला किंवा काही थंड खाणं-पिणं झालं तर सर्दी-पडसा होणं आलंच. लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा नेहमीच सर्दी होत राहते. अशात आपणही कधी लक्ष दिलं असेल की, जेव्हा आपल्याला सर्दी-पडसा होतो, तेव्हा आपला आवाज जड, खरखरीत किंवा वेगळाच वाटू लागतो. म्हणजे आवाज पूर्णपणे बदलून जातो. पण असं का होतं? नेमकी काय प्रक्रिया होते? हे समजून घेणं फारच इंटरेस्टींग आहे.
घशातील सूज हे मुख्य कारण
जेव्हा सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याचा परिणाम फक्त नाक किंवा घशापुरता मर्यादित राहत नाही. स्वरयंत्रे, ज्यांच्या कंपनाने आपला आवाज तयार होतो, त्यांच्यावर देखील या इन्फेक्शनचा प्रभाव होतो. या स्वरयंत्रांमध्ये सूज येते, ज्याला मेडिकल भाषेत लॅरिंजायटिस म्हणतात. सूज आल्यामुळे त्या जाड व जड होतात, त्यांचं कंपन मंदावतं आणि आवाज घोगरा किंवा बसलेला वाटू लागतो.
कफाचा प्रभाव
सर्दीच्या वेळी घशात जमा होणारा कफदेखील आवाज बदलण्याचं एक मोठं कारण असतो. कफाचा चिकट थर स्वरयंत्रांवर बसतो आणि त्यांच्या कंपनाला अडथळा आणतो. यामुळे आवाजात खरखर, गडदपणा किंवा वेगळेपणा जाणवतो. कधी-कधी सर्दी गेल्यानंतरही जर कफ टिकून राहिला, तर आवाज आधीसारखा होण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.
खोकल्याने वाढते समस्या
घसा बसल्यावर आपण वारंवार खोकणे किंवा गळा साफ करणे सुरू करतो, पण हे उलट नुकसानदायक ठरू शकते. असं केल्याने स्वरयंत्रांवर ताण येतो आणि त्यांच्यात छोट्या जखमा निर्माण होतात. अशात आवाज अधिक थकलेला, फाटलेला किंवा खरखरीत होतो.
आवाज जड का वाटतो?
जेव्हा स्वरयंत्रांना सूज येते, तेव्हा त्यांचा आकार आणि जाडसरपणा वाढतो. हे अगदी गिटारच्या जाड तारेसारखं आहे. जशी जाडी वाढते, तशी तिची कंपनगती कमी होते आणि आवाज अधिक जड होतो. म्हणूनच सूजलेल्या स्वरयंत्रांमुळे आवाज भारी वाटतो.
घशाला आराम देणारे उपाय
पुरेसे पाणी प्या - शरीर आणि गळा हायड्रेट ठेवा. शक्य असल्यास खोलीत ह्युमिडिफायर वापरा. याने घशातील सूज कमी होते आणि कफ पातळ होतो.
आवाजाला आराम द्या - हळू बोलणं किंवा कुजबुजणंदेखील स्वरयंत्रांना थकवू शकतं. त्यामुळे काही काळ पूर्ण शांत राहणं उत्तम.
जर दोन-तीन आठवड्यांनंतरही आवाज नॉर्मल झाला नाही, तर ही व्होकल कॉर्ड्सवरील गाठी, सूज किंवा अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्येची चिन्हं असू शकतात.