जेव्हा तुम्ही बाहेर काही खायला जाता, तेव्हा अनेकदा प्लास्टिक किंवा पेपरच्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि कपमध्ये पदार्थ दिले जातात. हे एकदाच वापरण्यासाठी (सिंगल युज) बनवलेले असतात आणि वापरण्यास सोपे मानले जातात. परंतु तुम्हाला माहित आहे का की रस्त्यावरील चहाच्या टपऱ्यांवर, ऑफिसमध्ये आणि हॉटेल्समध्ये वापरले जाणारे हे डिस्पोजेबल कप-प्लेट्स तुमच्यासाठी सुरक्षित नाहीत. डॉक्टरांच्या मते, उष्णतेच्या संपर्कात आल्यावर हे डिस्पोजेबल प्रॉडक्ट्स प्लास्टिकप्रमाणेच अनेक धोके निर्माण करू शकतात.
डिस्पोजेबल प्लेट-कप कशापासून बनतात?
डिस्पोजेबल कप आणि प्लेट्स दिसायला कागदासारखे वाटत असले तरी ते पूर्णपणे कागदाचे नसतात. त्यांना 'वॉटर रेझिस्टन्स' (पाणी न गळणारे) बनवण्यासाठी उत्पादक त्यावर प्लास्टिकचा एक पातळ थर चढवतात, जो डोळ्यांना सहज दिसत नाही. हा थर सामान्यतः पॉलिथिलीन (PE) किंवा तत्सम पॉलिमरपासून बनलेला असतो. हे थर द्रव पदार्थांना बाहेर गळण्यापासून रोखतात, पण त्याच वेळी ते अन्न किंवा पेय थेट प्लास्टिकच्या थराच्या संपर्कात आणतात, जे अत्यंत नुकसानदायक आहे.
जेव्हा गरम चहा, कॉफी किंवा ताजे शिजवलेले अन्न या प्लास्टिक कोटिंगच्या संपर्कात येते, तेव्हा तो थर मऊ होऊन विरघळू लागतो. यामुळे दोन प्रक्रिया वेगाने घडतात. पहिली म्हणजे सूक्ष्म प्लास्टिकचे कण (Microplastics) अन्नात मिसळू लागतात आणि दुसरं म्हणजे घातक रसायनं पेयामध्ये किंवा अन्नात विरघळतात.
डॉक्टर काय म्हणतात?
अहमदाबाद येथील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. भूपेश शाह यांच्या मते, "डिस्पोजेबल कपमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण बाहेर पडतात जे सहसा दिसत नाहीत. पण वारंवार यांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीराचं नुकसान होऊ शकतं. प्लास्टिकचे हे थर आणि त्यातील चिकटवणारे पदार्थ उच्च तापमानाला वितळतात आणि अन्नात मिसळतात."
डॉ. शाह पुढे सांगतात की, "अन्न आणि गरम पेयांमध्ये विरघळणारे हे सूक्ष्म प्लास्टिक शरीरात प्रवेश करू शकतात. हे कण शरीरातील अवयवांमध्ये जमा होऊ शकतात, आतड्यांच्या अस्तराला सूज किंवा जळजळ निर्माण करू शकतात आणि शरीराच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळा आणू शकतात. संशोधनानुसार, सूक्ष्म प्लास्टिकच्या संपर्कात आल्यामुळे आतड्यांना सूज येणं, मायक्रोबायोममध्ये बिघाड होणं आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणं असे धोके उद्भवू शकतात."
