पोटदुखी ही खूप सामान्य तक्रार आहे. खास म्हणजे महिलांमध्ये पोटदुखीचा त्रास अगदी कॉमन आहे. पाळीमुळे आणि इतरही काही कारणांमुळे पोटाला वेदना सहन कराव्या लागतात. मात्र कधी कधी संपूर्ण पोट न दुखता पोटाच्या एका ठराविक कोपऱ्यातच दुखणे जाणवते. असे दुखणे हलके असू शकते किंवा तीव्रही होऊ शकते. शरीर आपल्याला अशा वेळी काहीतरी संकेत देत असते. पोटाचा कोणता भाग दुखतो आहे यावरुन त्यामागील कारणांचा अंदाज लावता येतो.
१. अनेकांना पोटाच्या उजव्या बाजूला खाली दुखणे जाणवते. हे दुखणे अचानक सुरु झाले आणि हळूहळू वाढत गेले तर अपेंडिक्सचा त्रास असण्याची शक्यता असते. चालताना, खोकताना किंवा उठबस करताना दुखणे वाढत असेल तर दुर्लक्ष करू नये. काही वेळा गॅस किंवा बद्धकोष्ठतेमुळेही या भागात वेदना होतात, पण त्या सहसा थोड्याच वेळात कमी होतात.
२. डाव्या बाजूला पोट दुखत असेल तर पचनसंस्थेशी संबंधित कारणे असू शकतात. मोठ्या आतड्यात साठलेली घाण, बद्धकोष्ठता किंवा आतड्याला आलेली सूज यामुळे अशी वेदना जाणवते. महिलांमध्ये अंडाशयाशी संबंधित समस्या, पाळीच्या वेदना किंवा सिस्ट यामुळेही या भागात दुखणे होऊ शकते.
३. उजव्या वरच्या कोपऱ्यात पोट दुखणे हे बहुतेक वेळा यकृत किंवा पित्ताशयाशी जोडलेले असते. पित्ताशयात खडे असतील तर जेवणानंतर या भागात कळा येतात. कधी कधी जड, तेलकट जेवण केल्यावरही या भागात दुखणे जाणवते. उलटी, मळमळ किंवा ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
४. डाव्या वरच्या बाजूला दुखत असल्यास पोट, स्वादुपिंड किंवा स्प्लीन यांच्याशी संबंधित कारणे असू शकतात. आम्लपित्त, गॅस, अॅसिडिटी यामुळे या भागात जळजळ किंवा वेदना जाणवतात. जास्त ताण, उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे किंवा अनियमित जेवणामुळेही हा त्रास वाढतो.
५. कधी कधी लघवीच्या मार्गातील संसर्ग किंवा किडनी स्टोन यामुळेही पोटाच्या एका बाजूला तीव्र विदना होऊ शकतात. अशावेळी कंबर दुखणे, लघवी करताना जळजळ किंवा लघवीचा रंग बदलणे अशी लक्षणे दिसतात. महिलांमध्ये गर्भाशयाशी संबंधित समस्या, तर पुरुषांमध्ये काही अंतर्गत सूज यामुळेही एका बाजूला वेदना होऊ शकतात.
हे दुखणे गंभीरच असेल असे नाही. मात्र जर कळ येत असेल, दुखणे वारंवार उद्भवत असेल तर मग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. वेळीच उपचार घेणे कधीही चांगले.
