ऑक्टोबर महिन्यात तापमान अचानक वाढते आणि हवेत कोरडेपणा येतो. दिवसभर उन्हामुळे अंगातील उष्णता वाढते त्यामुळे चिडचिड होते, थकवा जाणवतो, डोकेदुखी, घाम जास्त येणे, त्वचा कोरडी पडणे आणि पचनाचे विविध त्रास होतात. या काळात शरीरात उष्णता साठते म्हणून थंड आणि संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि थकवा कमी करणारे घरगुती उपाय करणे गरजेचे असते.(October heat: October heat is very annoying, see 5 simple remedies that will keep your skin and body fresh) रात्री थंडी आणि सकाळी गरमा या बिनसलेल्या सुत्रामुळे शारीरिक थकवा वाढतो. त्यात उष्णतेच्या त्रासामुळे त्वचाही खराब होते. खाली काही सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत. ते नक्की करुन पाहा.
१. नारळपाणी प्या – ऑक्टोबरच्या गरम हवेत नारळपाणी हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे. ते शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते. त्यात पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे भरपूर असतात त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. रोज एकदा नारळपाणी प्यायल्याने थकवा आणि उष्माघात टाळता येतो.
२. ताक आणि साखरघोटा घ्या – घरगुती ताकात थोडं मीठ आणि जिरे घालून प्यायल्यास पचन सुधारते आणि अंगात ताजेपणा येतो. उष्णतेमुळे पचन मंदावते, पण ताकाने पोट थंड राहते. साखरघोटा (गूळ-लिंबूपाणी) प्यायल्याने उष्णता कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
३. काकडी आणि कलिंगड खा – हे दोन्ही पदार्थ थंड गुणधर्माचे असून शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवतात. काकडीतील पाण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त असल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहते. कलिंगडात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने थकवा आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तसेच दोन्ही पदार्थ चवीलाही छान असतात.
४. गुलाबपाणी आणि चंदन लावा – गरमीमुळे चेहरा गरम आणि लालसर होतो. गुलाबपाण्यात चंदनपूड मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. यामुळे त्वचा शांत, तजेलदार आणि ओलसर राहते. एवढेच नाही तर त्वचेला गरजेची असणारी इतरही सारी पोषणसत्वे मिळतात.
५. पुदिन्याचे पाणी – पुदिन्याची पाने उकळून थंड करून त्याचे पाणी दिवसभर थोडं-थोडं पिणं फायदेशीर ठरतं. ते शरीराला आतून थंड करतं आणि ताजेतवाने वाटते. हवं असल्यास त्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने चवही छान लागते आणि उष्णता आटोक्यात राहते.