उन्हाळा सुरू झाला की शरीरात उष्णता वाढते. वातावरणामुळे तर वाढतेच मात्र चुकीच्या आहारामुळेही वाढते. अंगावर पुरळ येणे, अॅसिडिटी वाढणे, सतत तहान लागणे किंवा जळजळ होणे हे सगळे त्रास बहुतांश वेळा चुकीच्या आहारामुळेच वाढतात. आयुर्वेदानुसार काही पदार्थांचा स्वभाव उष्ण असतो आणि ते शरीरातील पित्त वाढवतात. (Nutritious but to hot for body - eating them can damage your skin and digestion! during summer)त्यामुळे उन्हाळ्यात असे पदार्थ जपून खाणे किंवा टाळणे आवश्यक असते. हे पदार्थ पौष्टिक आहेत फक्त उन्हाळ्यात ते शरीरासाठी चांगले ठरत नाहीत एवढंच.
पपई आणि तीळ हे उष्ण गुणधर्माचे पदार्थ म्हणून ओळखले जातात. पपई पौष्टिक असली तरी ती उष्ण आहे. पाळी वेळेवर यावी यासाठी अनेक जणी पपई खातात. कारण तेवढी उष्णता ती शरीरात निर्माण करते. त्यामुळे ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढू शकते. त्याचप्रमाणे तीळ शरीराला उष्णता देतात, म्हणूनच ते हिवाळ्यात जास्त खाल्ले जातात. उन्हाळ्यात मात्र त्यांचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य ठरते.
याशिवाय गूळ हा देखील उष्ण प्रभाव असलेला पदार्थ आहे. गुळामुळे शरीरात उष्णता वाढू शकते, त्यामुळे उन्हाळ्यात गुळाचे प्रमाण कमी ठेवणे चांगले. शेंगदाणे हे पौष्टिक असले तरी त्यांचा स्वभावही उष्ण असल्यामुळे जास्त खाल्ल्यास पित्त वाढून त्वचेच्या समस्या किंवा अॅसिडिटी होऊ शकते. आंबा हे उन्हाळ्यातील आवडते फळ खायलाच हवे मात्र अति सेवन केले तर गळू झालेच म्हणून समजा. म्हणूनच आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवण्याची पद्धत आहे, ज्यामुळे त्याची उष्णता काही प्रमाणात कमी होते. आमरसात चमचाभर तूप घातले जाते त्यामुळे आंबा बाधत नाही.
तसेच मसालेदार पदार्थांमध्ये वापरले जाणारे लवंग, दालचिनी, काळीमिरी यांसारखे गरम मसाले शरीरात उष्णता वाढवतात. उन्हाळ्यात जास्त तिखट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यास घाम जास्त येणे, पोटात आग होणे आणि अस्वस्थता वाढणे असे त्रास होतात. मद्यपान देखील शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करुन उष्णता वाढवते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
उन्हाळ्यात खाण्याच्या सवयी थोड्या बदलल्या तर शरीराला खूप आराम मिळतो. जड, तेलकट, तिखट आणि उष्ण पदार्थ टाळून हलका आणि थंडावा देणारा आहार घेतल्यास पचन नीट राहते. ताक, दही, नारळपाणी, काकडी, कलिंगड यांसारखे पदार्थ शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात आणि शरीर हायड्रेटेड ठेवतात.
