Ayurvedic Remedies For Blocked Nose: वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावर दिसून येतो. सध्या कधी पाऊस तर कधी कडक उन्हामुळे सर्दी-खोकला, घशात खवखव, ताप अशा समस्यांनी भरपूर लोक पीडित आहेत. लहान मुलांसोबतच मोठेही सर्दी-खोकल्यानं वैतागलेत. सर्दी-खोकला झाला की, कशात मनही लागत नाही आणि आरामही मिळत नाही. लोक लगेच वेगवेगळी औषधं घेण्यासाठी धावतात. पण आयुर्वेदात यावर काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आयुर्वेद न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून काही घरगुती उपाय सांगितले आहेत.
व्हिडिओत न्यूट्रिशनिस्ट श्वेता सांगतात की, नाक बंद होणे, सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, घशात खवखव या समस्या दूर करण्यासाठी पाण्यात काही गोष्टी टाकून वाफ घेतल्यास लगेच आराम मिळतो. इतकंच नाही तर तब्येतही लवकर बरी होऊ शकते.
कशी घ्याल वाफ?
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर आपल्याला सर्दी-पडसा तर ओव्याची वाफ घेणं फायदेशीर ठरू शकतं. यासाठी १ चमचा ओवा, १ तमालपत्र आणि चिमुटभर काळी मिरी पूडची गरज भासेल.
या तिन्ही गोष्टी पाण्यात टाका आणि पाणी उकडा. जेव्हा या गोष्टी पाण्यात चांगल्या मिक्स होतील आणि त्यातून वाफ निघू लागेल तेव्हा गॅस बंद करा. हे पाणी एखाद्या मोठ्या तोंडाच्या भांड्यात टाका. डोक्यावर टॉवेल घ्या आणि ५ ते ७ मिनिटं चांगली वाफ घ्या.
कसा मिळेल फायदा?
श्वेता शाह सांगतात की, ओवा आणि काळी मिरीची तिखट वाफ बंद झालेलं नाक मोकळं करते आणि श्वास घेणं सोपं करते. तसेच तमालपत्रानं व्हायरससोबत लढण्यास मदत मिळते. हा उपाय सर्दी झाल्यावर लगेच केल्यास अधिक प्रभावी ठरतो.
सर्दी, खोकला, बंद नाक आणि छातीत जडपणा
जर आपल्याला सर्दी, खोकला असेल, नाक बंद असेल आणि छातीत दाटल्यासारखं वाटत अशेल तर आपण तुळशी-ओव्याची वाफ घेऊ शकता. यासाठी ७ ते ८ तुळशीची पानं घ्या, १ चमचा ओवा घ्या, चिमुटभर सैंधव मीठ आणि २ ते ३ थेंब यूकेलिप्टस ऑइल घ्या.
या सगळ्या गोष्टी पाण्यात टाकून पाणी चांगलं उकडा. पाणी चांगलं गरम झाल्यावर डोक्यावर टॉवेल ठेवून साधारण ५ ते ८ मिनिटं वाफ घ्या.
कसा मिळेल फायदा?
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, तुळशी आणि ओवा दोन्ही गोष्टी कफ बाहेर काढण्यासाठी मदत करतात. यूकेलिप्टस ऑइल मिक्स केलं तर याचा प्रभाव अधिक दिसतो. यानं छाती आणि सायनस दोन्ही साफ होतात. बंद नाकही मोकळं होतं.