Onion Benefits for Bones : भारतात सामान्यपणे सगळ्याच भाज्या किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कांदा टाकला जातो. भरपूर लोक जेवणासोबत कच्चा कांदाही खातात. खासकरून उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक कच्चा कांदा खातात. केवळ भारतातच नाही तर जगभरात कांदा वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्ला जातो. कांद्यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात जे सामान्यपणे लोकांना माहीत नसतात.
कांद्यातील पोषक तत्व
कांद्यामध्ये भरपूर वेगवेगळे पोषक तत्व असतात, ज्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटामिन सी, बी6, फोलेट, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि फॉस्फोरस यांचा समावेश करता येईल. त्याशिवाय कांद्यात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणही भरपूर असतात, जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात.
तुम्ही सुद्धा कांद्याच्या अनेक फायद्यांबाबत वाचलं किंवा ऐकलं असेल. कांद्यानं इम्यूनिटी वाढते, हृदयरोगांचा धोका कमीहोतो, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं इत्यादी इत्यादी. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोज कांदा खाल्ल्यानं हाडं कसे मजबूत होतात आणि यासाठी कांदा कसा खावा.
न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉक्टर मेगन रॉसी (Dr Megan Rossi) या नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या टिप्स देत असतात. अशात त्यांनी कांद्यासंबंधी एक व्हिडीओ पोस्ट करून याच्या फायद्यांबाबत सांगितलं आहे.
बोन डेंसिटीवर पडतो प्रभाव
डॉक्टर मेगन यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, मेनोपॉजमध्ये प्रकाशित एका शोधात सांगण्यात आलं आहे की, 50 वयोगटातील अशा महिला ज्या रोज कांदा खातात, त्यांच्यात बोन मिनरल डेसिंटी 5 टक्क्यांनी अधिक असते. म्हणजे यांची हाडं कमी कांदा खाणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात.
त्याशिवाय इतर एका शोधातून समोर आलं आहे की, रोज 10 मिली कांद्याचा रसही हाडांचं नुकसान कमी करण्यास मदत करतो. डॉक्टरांनी सांगितलं की, 50 पेक्षा अधिक वयाच्या 3 पैकी 1 महिलेला ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) मुळे फ्रॅक्चरचा सामना करावा लागतो. अशात कांदा नियमित खाणं फायदेशीर ठरतो.
कांदा हाडांसाठी कसा ठरतो फायदेशीर?
कांद्यापासून हाडांना मिळणाऱ्या फायद्यांची दोन कारणं आहेत. एक म्हणजे कांद्यात आढळणारे यूनिक प्लांट केमिकल्स जे बोन सेल्सना अॅक्टिवेट करण्यास मदत करतात. दुसरं म्हणजे यातील प्रीबायोटिक अधिक कॅल्शिअम अॅब्जॉर्ब करण्यास मदत करतं.
कसा खावा कांदा?
कांद्याचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आहारात समावेश करू शकता. जसे की, कांदा तुम्ही भाजीत टाकू शकता, सलादमध्ये टाकू शकता. तसेच तुम्ही तुम्ही जेवणासोबत कच्चा कांदाही खाऊ शकता. खास बाब म्हणजे कांद्यात कॅलरी कमी असतात, अशात वजन वाढण्याचा धोकाही कमी असतो.