शांत झोप लागणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेकदा ताणतणाव, अस्वस्थता, बदललेली जीवनशैली किंवा काही शारीरिक त्रासांमुळे झोप नीट लागत नाही. (No matter how hard you try, can't sleep? Maintaining your sleep cycle is very important, here are some tips to get a restful sleep)झोप नीट झाली नाही तर कोणतेच काम धड करता येत नाही. पडल्यापडल्या शांत झोपणाऱ्यांना आळशी समजून त्याची खिल्ली अनेक जण उडवतात मात्र खरंतर ते सुखी असण्याचे लक्षण आहे. वेळेवर झोप लागणे महत्त्वाचे असते.
चांगली झोप लागावी यासाठी आधी नियमित झोपेची वेळ निश्चित करणे महत्त्वाचे ठरते. रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचं चक्र व्यवस्थित चालतं. झोपण्याच्या आधी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर टाळणे गरजेचे आहे कारण त्यातील प्रकाश मेंदूला जागे राहण्याचे संकेत देतो. झोपण्यापूर्वी हलका आणि पचायला सोपा आहार घेणे, तसेच जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपणे हे पचनास अनुकूल ठरते आणि झोप सहज लागते.
दिवसभर थोडा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल केल्याने शरीराला थकवा येतो, त्यामुळे रात्री झोप पटकन लागते. मात्र झोपण्याच्या अगोदरचा व्यायाम टाळावा. पुस्तक वाचा, ध्यान, प्राणायाम किंवा गरम पाण्याने अंघोळ अशा सवयी झोपेपूर्वी अंगीकारल्यास मन अधिक स्थिर होते. कॅफीन, चहा, कॉफी किंवा धूम्रपानातील निकोटीन झोपेमध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे विशेषतः त्यांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. चहा कॉफी संध्याकाळी पिणे टाळा.
कामाचा ताण जास्त असला तरी झोप लागत नाही. त्यामुळे वर्क लाइफ आणि वैयक्तिक आयुष्य संतुलित ठेवायला शिका. त्याचा फार फायदा होतो. कामावरुन घरी गेल्यावर कामाचा विचार करणे टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवा. शांत आणि गुणकारी झोप मिळवण्यासाठी जीवनशैलीतील हे छोटे बदल खूप उपयुक्त ठरतात. परंतु तरीही झोप न लागण्याची समस्या दीर्घकाळ टिकली, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
झोपण्याआधी हळदीचे दूध पिणे किंवा सुंठीचा काढा पिणे फायद्याचे ठरते. तसेच जायफळाचे दूध पिणे फायद्याचे ठरते. त्याने छान झोप लागते. लहान मुलांनाच त्याचा फायदा होतो असे नाही. सगळ्यांसाठीच झोपताना दूध पिणे उपयुक्त ठरते.