Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Nipah Virus: संकटं संपता संपेना! ना लस, ना खात्रीशीर उपचार... निपाह व्हायरस किती धोकादायक, कसा होतो प्रसार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:22 IST

Nipah Virus : निपाह व्हायरसची भीती अधिक असण्याचं कारण म्हणजे हा व्हायरस माणसांमध्ये पसरतो आणि अद्याप यावर कोणताही खात्रीशीर उपचार किंवा लस उपलब्ध नाही.

भारतात निपाह व्हायरसच्या (Nipah Virus) नवीन प्रकरणांची पुष्टी होताच केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. हा तोच व्हायरस आहे ज्याचा मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. पश्चिम बंगालमध्ये याची लागण झालेली रुग्ण आढळताच अनेक आशियाई देशांनी तातडीने विमानतळांवर स्क्रीनिंग, आरोग्य तपासणी आणि प्रवाशांवर देखरेख कडक केली आहे.

निपाह व्हायरसची भीती अधिक असण्याचं कारण म्हणजे हा व्हायरस माणसांमध्ये पसरतो आणि अद्याप यावर कोणताही खात्रीशीर उपचार किंवा लस उपलब्ध नाही. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील याला उच्च जोखीम असलेला आणि महामारी पसरवण्याची क्षमता असलेला व्हायरस मानते.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्याजवळील एका खासगी रुग्णालयात निपाह व्हायरस संसर्गाची पुष्टी झाली आहे. यानंतर वेगाने 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' सुरू करण्यात आलं. सुमारे १०० लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, तर १८० हून अधिक लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी २० जण 'हाय रिस्क' श्रेणीत आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

निपाह व्हायरस आहे तरी काय?

निपाह व्हायरस हा एक 'झुनोटिक' (Zoonotic) आजार आहे, म्हणजेच तो प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतो. फळं खाणारी वटवाघूळ या व्हायरसचे नैसर्गिक वाहक मानले जातात. हा व्हायरस दूषित फळं किंवा अन्न खाल्याने, बाधित डुकरांच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो.

निपाह व्हायरस किती धोकादायक?

निपाह व्हायरस इतर व्हायरसच्या तुलनेत खूपच भयानक आहे. यामध्ये मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असू शकतो. हा व्हायरस अधिक घातक ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे तो थेट मेंदूवर हल्ला करतो, ज्यामुळे रुग्ण कोमात जाऊ शकतो. एकदा रुग्ण कोमात गेला की त्याचा जीव वाचवणं कठीण होतं. विशेष म्हणजे या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसल्यामुळे काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे.

निपाह व्हायरसची लक्षणं 

ताप

डोकेदुखी

अंगदुखी, 

उलट्या 

घसा खवखवणे.

श्वास घेण्यास त्रास होणे, 

न्यूमोनिया

 बेशुद्ध पडणे किंवा गोंधळलेली अवस्था 

मेंदूला सूज येणे 

अनेकदा रुग्णामध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

काळजी घ्या

बाहेरची कापलेली किंवा पक्ष्यांनी कुरतडलेली फळं खाणं टाळा.

लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

संक्रमित रुग्णापासून सुरक्षित अंतर राखा आणि मास्कचा वापर करा.

ज्या भागात व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात जाणं टाळा.

सध्या निपाह व्हायरसवर कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. उपचार केवळ लक्षणांच्या आधारावर आणि 'सपोर्टिव्ह केअर'पर्यंत मर्यादित आहेत. याच कारणामुळे सरकार प्रतिबंध, स्क्रीनिंग आणि जागरूकतेवर जास्त भर देत आहे. भारतात निपाहची प्रकरणं समोर आल्यानंतर आशियाई देशांचे 'अलर्ट मोड'वर येणं हेच दर्शवते की, हा व्हायरस किती धोकादायक आणि संवेदनशील मानला जातो. वेळेत घेतलेली खबरदारी हाच यापासून बचावाचा सर्वात मोठा मार्ग आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nipah Virus Outbreak: No Cure, High Mortality, Spreading Concerns.

Web Summary : Nipah virus cases spark Asian alert. High mortality, no cure, spreads via animals/people. Symptoms: fever, headache, brain swelling. Prevention crucial: avoid contaminated food, isolate.
टॅग्स : निपाह विषाणूभारतआरोग्यविमानतळपश्चिम बंगाल