आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ १० ते ६ पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो. त्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो.
नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ते तंदुरुस्त, उत्साही आणि सक्रिय वाटत नाहीत. आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी असतात. त्यांना थकवा, अशक्तपणा जाणवतो, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतील. डॉ. पाल मणिकम यांनी तीन बेस्ट नाइट शिफ्ट डाएट टिप्स सांगितल्या आहेत.
डॉ. पाल मणिकम म्हणाले की, नाइट शिफ्टमुळे डिप्रेशनचा धोका वाढतो, मूड स्विंग्स होतात, डायबेटिस होण्याची शक्यता आणि झोपेची कमतरता असल्याने अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाइट शिफ्ट असलेला जॉब सोडा. हे खरंच गरजेचं आहे पण काही लोकांसाठी हे प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे नाइट शिफ्ट करताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.
रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका
रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत काहीही खाऊ नका. नाईट शिफ्ट करणाऱ्या खूप लोकांच्या त्यांच्या मॅनेजरपेक्षा स्विगी बॉयसोबत जास्त मिटींग असतात.
भरपूर पाणी प्या
या वेळेत तुम्हाला जर खूप भूक लागली तर कृपया जास्तीत जास्त पाणी प्या. मध्यरात्री स्नॅक्स किंवा काहीही खाणं टाळा.
प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार
तुम्ही जे रात्रीचं जेवण जेवणार आहात ते पोषकत्त्वांनी परिपूर्ण असावं, प्रोटीन आणि फायबरयुक्त असावं. त्यामध्ये अंडी, पनीर, फळं अशा गोष्टींचा नक्की समावेश करा.
खूप लोक रात्री दोन वाजता आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा प्यायला जातात. त्यावेळी ते चहावाला नेमके किती पैसे कमावत असेल याविषयी चर्चा करतात. पण नाईट शिफ्ट केल्यावर रुग्णालयात जेव्हा आपल्याला उपचारासाठी दाखल करावं लागेल तेव्हा किती पैसे खर्च करावे लागतील यावर ते कधीच बोलत नाहीत असं देखील डॉ. पाल मणिकम यांनी म्हटलं आहे.